मोदींनी घडवली नितीश कुमार आणि बायडन यांची भेट, आता या फोटोची होतेय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 05:22 PM2023-09-10T17:22:14+5:302023-09-10T17:23:52+5:30
G20 Summit: जी-२० शिखर संमेलनातील एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाडन यांच्याशी भेट घडवून आणताना दिसत आहेत.
जी-२० शिखर संमेलनाच्या डिनरमध्ये भारतातील लोकशाहीचं एक सुंदर चित्र पाहायला मिळालं. येथे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील सर्व नेत्यांना परदेशातील नेत्यांसोबत भेटीगाठी घेतल्या. आता याच भेटींमधील एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाडन यांच्याशी भेट घडवून आणताना दिसत आहेत.
जी-२० शिखर संमेलनातील पहिल्या दिवसाच्या समारोपानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांवी या बैठकीत सहभागी झालेल्या नेत्यांना मेजवानी दिली होती. त्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह अनेक आघाडीचे नेते सहभागी झाले होते. सरकारने जी-२० शिखर संमेलनाचे आयोजनस्थळ असलेल्या नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रित केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमस्थळी पाहुण्यांचं स्वागत केलं. दरम्यान, या मेजवानीचे काही फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्यासह इतर नेत्यांची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान, मोदींनी नितीश कुमार आणि हेमंत सोरेन यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी भेट घडवून आणली. तसेच या मेजवानीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुक्खू यांच्याशी चर्चा करत असताना दिसले.
भाजपा आणि जनता दल युनायटेड यांच्यातील आघाडी तुटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यातील ही पहिलीच भेट होती. त्यामुळे या फोटोला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. नितीश कुमार यांनी गतवर्षी भाजपासोबत असलेलं नातं तोडून आरजेडी आणि इतर पक्षांना सोबत घेत सरकार स्थापन केलं होतं. आता नितीश कुमार हे विरोधी इंडिया आघाडीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेतून हटवणं हे या आघाडीचं लक्ष्य आहे. असं असूनही नरेंद्र मोदी यांनी सर्व राजकीय मतभेत बाजूला ठेवत नितीश कुमार यांच्याशी साधलेल्या संवादाची चर्चा होत आहे.