आम्ही हिंसाचार आणि द्वेषाच्या विरोधात; कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडोंचे खलिस्तानबाबत भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 06:31 PM2023-09-10T18:31:21+5:302023-09-10T18:32:12+5:30

बैठकीत PM नरेंद्र मोदी यांनी कॅनडातील खलिस्तानी समर्थकांचा मुद्दा उपस्थित केला.

G20India-canada-pm-justin-trudeau-pm-narendra-modi-meeting-khalistani-extremists | आम्ही हिंसाचार आणि द्वेषाच्या विरोधात; कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडोंचे खलिस्तानबाबत भाष्य

आम्ही हिंसाचार आणि द्वेषाच्या विरोधात; कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडोंचे खलिस्तानबाबत भाष्य

googlenewsNext

G20 India: राजधानी दिल्लीत आयोजित G20 शिखर परिषदेचा (G20 Summit) आज समारोप झाला. यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. बैठकीत दोन्ही देशांच्या नेत्यांनी खलिस्तानसह परकीय हस्तक्षेपाच्या मुद्द्यावर चर्चा केली. बैठक संपल्यानंतर ट्रुडो यांनी खलिस्तान मुद्द्यावर आपले मत मांडले.

कॅनडात अभिव्यक्ती स्वातंत्र्य
ट्रुडो पुढे म्हणतात, पंतप्रधान मोदी यांच्या भेटीदरम्यान भारत आणि कॅनडामधील नियमांचे पालन करण्याबाबतही चर्चा झाली. कॅनडा नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करतो, परंतु आम्ही हिंसाचार आणि द्वेष पसरविण्याच्या विरोधात आहोत. खलिस्तानी अतिरेक्यांच्या मुद्द्यावर ट्रूडो म्हणाले की, काही लोक संपूर्ण समुदायाचे प्रतिनिधित्व करत नाहीत.

आम्ही हिंसेच्या विरोधात
ट्रूडो पुढे म्हणाले, द्विपक्षीय बैठकीत खलिस्तानी अतिरेकी आणि परदेशी हस्तक्षेप, या मुद्द्यांवर चर्चा झाली. गेल्या काही वर्षांत हा मुद्दा अनेकदा चर्चिला गेला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण निषेधाचे स्वातंत्र्य कॅनडासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्ही नेहमीच हिंसाचार थांबवण्यासाठी आणि द्वेष कमी करण्यासाठी उभे आहोत. काही व्यक्तींच्या कृती संपूर्ण समुदायाचे किंवा कॅनडाचे प्रतिनिधित्व करत नाहीत.

भारत कॅनडाचा महत्त्वाचा भागीदार 
भारत-कॅनडा संबंध आणि पंतप्रधान मोदींसोबतच्या त्यांच्या संबंधांबद्दल, कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, आम्ही जाणतो की, भारत ही जगातील एक महत्त्वाची अर्थव्यवस्था आहे. हवामान बदलाशी लढा देण्यापासून ते विकास आणि समृद्धी निर्माण करण्यापर्यंत, प्रत्येक गोष्टीत भारत कॅनडासोबत आहे. आम्हाला आणखी काम करायचे आहे आणि आम्ही ते करत राहू.

कॅनडात भारतविरोधी पोस्टर्स 
खलिस्तानी समर्थकांना आश्रय दिल्याने कॅनडा अनेकदा चर्चेत असतो. भारतात जेव्हा-जेव्हा खलिस्तानी दहशतवाद्यांवर कारवाई होते, तेव्हा त्याचे पडसाद कॅनडात उमटतात. अलीकडेच, खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर समर्थकांनी 8 जुलै रोजी कॅनडात भारतविरोधी रॅली काढण्याची घोषणा केली होती. कॅनडात अनेक ठिकाणी रॅलीसंदर्भातील पोस्टर्स पाहायला मिळाले होते.

पोस्टरवर भारताने तीव्र आक्षेप नोंदवला 
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडातील या रॅलीवर तीव्र आक्षेप नोंदवला होता. परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले की, कॅनडामध्ये लावण्यात आलेले पोस्टर्स आमच्या राजनैतिक अधिकारी आणि दूतावासांवर हल्ला करण्यासाठी चिथावणी देणारे आहेत. हे भारताला कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही. 

 

Web Title: G20India-canada-pm-justin-trudeau-pm-narendra-modi-meeting-khalistani-extremists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.