जी-७ शिखर परिषदेसाठी नरेंद्र मोदी इटलीला रवाना, जॉर्जिओ मेलोनी यांची घेणार भेट!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 09:27 AM2024-06-13T09:27:11+5:302024-06-13T09:29:18+5:30
G7 summit : तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे.
नवी दिल्ली : जी-७ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीइटलीला रवाना झाले आहेत. उच्चस्तरीय शिष्टमंडळासह १४ जून रोजी होणाऱ्या शिखर परिषदेच्या संपर्क सत्रात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी इटलीला रवाना झाले. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. दरम्यान, १३ ते १५ जून या कालावधीत इटलीच्या अपुलिया भागातील बोर्गो एग्नाझिया या आलिशान रिसॉर्टमध्ये होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेत युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आणि गाझामधील संघर्ष हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.
युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे संवाद आणि मुत्सद्दीपणा असल्याचा पुनरुच्चार भारताने बुधवारी केला. युक्रेन संघर्षाबाबत विचारले असता परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा म्हणाले, "आमचे नेहमीच असे म्हणणे आहे की, हा संघर्ष सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्दीपणा हा सर्वोत्तम पर्याय आहे." दरम्यान, विनय क्वात्रा यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'आज युद्धाचे युग नाही' या विधानाची आठवण करून दिली. तसेच, विनय क्वात्रा यांनी युद्धाच्या परिणामांबद्दल सांगितले, ज्यात अन्न, इंधन आणि खतांच्या उपलब्धतेवर परिणाम, जागतिक पुरवठा साखळीतील आव्हाने आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील व्यत्यय यांचा समावेश आहे.
#WATCH | PM Narendra Modi is to travel to Apulia, Italy today to participate in the 50th G7 Summit scheduled to be held in Apulia, Italy from 13-15 June. India has been invited as an Outreach Country.
— ANI (@ANI) June 13, 2024
(Visuals of International Media Centre, Fiera del Levante Exhibition Centre,… pic.twitter.com/gFv7gC4BBn
१४ जूनला पंतप्रधान मोदी संपर्क सत्रात सहभागी होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून रोजी इतर देशांशी संपर्क सत्रात सहभागी होतील. हे सत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऊर्जा, आफ्रिका आणि भूमध्यसागरीय विषयांवर लक्ष केंद्रित असणार असल्याचे परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा म्हणाले. तसेच, जी-७ शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहभागामुळे गेल्या वर्षी भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी-२० शिखर परिषदेच्या परिणामांवर चर्चा करण्याची संधी मिळेल. जी-७ शिखर परिषदेत भारताचा नियमित सहभाग जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी नवी दिल्लीच्या प्रयत्नांची वाढती ओळख दर्शवतो, असेही विनय क्वात्रा यांनी सांगितले.
जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत, असे विनय क्वात्रा यांनी सांगितले. ते म्हणाले, "बैठकीत, दोन्ही पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण पैलूंचा आढावा घेणे आणि पुढील टप्प्यांसाठी दिशा देणे अपेक्षित आहे." याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणखी काही नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत का? असे विचारले असता विनय क्वात्रा यांनी थेट उत्तर दिले नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वेळापत्रक अद्याप ठरविले जात असल्याचे सांगितले.