गडकरी बदनामी; केजरीवालांकडून याचिका मागे

By admin | Published: May 26, 2015 11:51 PM2015-05-26T23:51:37+5:302015-05-26T23:51:37+5:30

कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका केजरीवाल यांनी मंगळवारी मागे घेतली.

Gadkari defamation; Kejriwal's petition back | गडकरी बदनामी; केजरीवालांकडून याचिका मागे

गडकरी बदनामी; केजरीवालांकडून याचिका मागे

Next

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात दाखल केलेल्या बदनामी खटल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका केजरीवाल यांनी मंगळवारी मागे घेतली.
न्या. संजीव खन्ना आणि न्या. आशुतोष कुमार यांच्या खंडपीठाने केजरीवाल यांना याचिका मागे घेण्याची परवानगी दिली.
केजरीवाल यांनी कनिष्ठ न्यायालयाने गतवर्षी सुनावलेल्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
गडकरींनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानी खटल्यात जातमुचलका न भरल्यामुळे केजरीवालांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचा आदेश कनिष्ठ न्यायालयाने दिला होता. या आदेशाला केजरीवाल यांनी आव्हान दिले होते. न्यायालयीन कोठडी सुनावणे गरजेचे नाही. या ऐवजी आपल्याला लेखी शपथपत्र देण्याची परवानगी दिली जायला हवी होती, असा युक्तिवाद त्यांनी केला होता.
गतवर्षी ३१ जुलैला उच्च न्यायालयाने गडकरी आणि केजरीवाल दोघांनाही आपसी सामंजस्याने हा वाद निकाली काढण्याचा सल्ला दिला होता. ३० जानेवारी २०१४ रोजी केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने देशातील सर्वाधिक भ्रष्ट व्यक्तींची यादी जाहीर केली होती. या यादीत गडकरींच्या नावाचा समावेश होता. यानंतर गडकरींनी केजरीवालांविरुद्ध मानहानी प्रकरण दाखल केले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Gadkari defamation; Kejriwal's petition back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.