गडकरींच्या राजीनाम्यासाठी तिसऱ्या दिवशीही गदारोळ
By admin | Published: May 12, 2015 11:36 PM2015-05-12T23:36:24+5:302015-05-12T23:36:24+5:30
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून मंगळवारी पुन्हा संसदेत गदारोळ झाला. राज्यसभेचे कामकाज
नवी दिल्ली : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून मंगळवारी पुन्हा संसदेत गदारोळ झाला. राज्यसभेचे कामकाज सलग तिसऱ्या दिवशी ठप्प पाडले, तर लोकसभेत या मुद्यावरून काँग्रेस व डाव्या पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला.
गडकरींच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे भोजनापूर्वी किमान पाचवेळा कामकाज तहकूब करावे लागले. लोकसभेतही प्रचंड गदारोळ झाला.
पूर्ती साखर कारखान्यातील गैरव्यवहारावर ‘कॅग’ने आपल्या अहवालात ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे गडकरींनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी करीत काँग्रेस सदस्यांनी लोकसभेत गोंधळ घातला.
काँग्रेसचे दीपेंदर हुड्डा यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला. गंभीर स्वरूपाचा वित्तीय गैरप्रकार करण्यात आल्यामुळे सरकारी तिजोरीला १२.७ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे ‘कॅग’च्या अहवालात नमूद केले आहे, असे हुड्डा म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)