एफडीआयसाठी गडकरी अमेरिका दौऱ्यावर
By Admin | Published: July 10, 2016 02:28 AM2016-07-10T02:28:12+5:302016-07-10T02:28:12+5:30
भारताचे भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी रविवारी एक आठवड्याच्या अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात अब्जावधी डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित
वॉशिंग्टन : भारताचे भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी रविवारी एक आठवड्याच्या अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात अब्जावधी डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करणे आणि अमेरिकेसोबतच्या द्विपक्षीय संबंधांना गती देणे हा या दौऱ्याचा उद्देश आहे.
केंद्रीय मंत्री या नात्याने गडकरी यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा असून वॉशिंग्टन ते लॉस एंजल्स अशा या दौऱ्यात ते न्यूयॉर्क, सेंट लुईस आणि सॅन फ्रान्सिस्कोलाही भेट देतील. ते अमेरिकेचे परिवहनमंत्री अँथनी फॉक्स यांच्याशी ११ जुलै रोजी चर्चा करतील. पायाभूत सुविधा क्षेत्रात सहकार्य वाढविणे आणि भारत-अमेरिका संबंधांचा विस्तार हा या बैठकीचा उद्देश आहे. अमेरिकी परिवहन विभागात गडकरी येथील केंद्रीय महामार्ग प्रशासन, अमेरिकी नौदल प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षा प्रशासनाच्या आदर्श प्रणालीची पाहणीही करतील. ते वॉशिंग्टन येथील अटलांटिक कौन्सिलतर्फे आयोजित पायाभूत सुविधांवरील चर्चेत भाग घेतील. महामार्ग विकास, रस्ता तंत्रज्ञान, रस्ता सुरक्षा आणि आॅटोमोबाईल क्षेत्रासाठी हरित इंधनाचा विकास आदी क्षेत्रांत अमेरिकेशी सहकार्य हा दौऱ्याचा उद्देश आहे. (वृत्तसंस्था)