गडकरींचं नवतंत्रज्ञान, चालकानं दारू प्यायल्यास गाडीचं इंजिनच सुरू होणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 07:24 PM2019-07-09T19:24:14+5:302019-07-09T19:28:09+5:30
रस्ते अपघात वाढत असून त्यासंदर्भात सरकारचे धोरण, याबाबत राज्यसभेत उत्तर देताना गडकरींनी नव तंत्रज्ञानाची माहिती दिली.
नवी दिल्ली - केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी नेहमीच आपल्या कामामुळे चर्चेत असतात. रस्तेबांधणी असो किंवा परिवहन विभागातील काही निर्णय असो, गडकरींचं कामच बोलतंय. गडकरी यांच्या कामाचा झपाटा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कास ही त्यांच्या कामाची शैली आहे. यापूर्वी 8 वी नापास तरुणही चारचाकी गाडीचा परवाना मिळवू शकतील, हा निर्णय घेऊन त्यांनी देशातील लाखो तरुणांना रोजगार दिला आहे. त्यांच्या या निर्णयाचे मोठं कौतुकही झालं. त्यानंतर आता गडकरींनी संसदेत एका प्रश्नावर उत्तर देताना, अपघात कमी करण्यासाठीही नवीन तंत्रप्रणालीचा वापर करत असल्याचे म्हटले.
रस्ते अपघात वाढत असून त्यासंदर्भात सरकारचे धोरण, याबाबत राज्यसभेत उत्तर देताना गडकरींनी नव तंत्रज्ञानाची माहिती दिली. वाहन चालकाने सीटबेल्ट न घातल्यास पोलीस नियंत्रण कक्षाला त्याची माहिती आपोआप मिळेल, अशी व्यवस्थाही करण्यात येणार असल्याचंही गडकरींनी सांगितले. तसेच दारू प्यायल्यानेच सर्वाधिक अपघात होतात. त्यामुळे दारू प्यायल्यानंतर गाडीचे इंजिनच सुरू होणार नाही, अशीही यंत्रप्रणाली गाडीत बसविण्यात येणार असल्याचे गडकरींनी सांगितले. तसेच, गाडीचे टायर बनविण्यासाठी रबरासोबतच सिलिकॉनचाही वापर अमेरिका आणि पाश्चात्य देशांमध्ये केला जातो. तर, नायट्रोजनचाही उपयोग या टायरांच्या निर्मित्तीसाठी होतो, त्यामुळे टायर गरम होण्याचं प्रमाण अत्यल्प असते. आपल्या देशात गाडीचे टायर फुटूनही अनेक अपघात होतात. त्यामुळे याप्रणालीच्या टायरचा वापर करण्याचंही विचाराधीन असल्याचे गडकरी यांनी म्हटले.
दरम्यान, यमुना एक्स्प्रेस महामार्गावर झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना गडकरी यांनी या नव्या तंत्रज्ञानाची माहिती दिली.