गायकवाड प्रकरणाचे संसदेत पडसाद

By admin | Published: March 28, 2017 04:10 AM2017-03-28T04:10:01+5:302017-03-28T04:10:01+5:30

शिवसेनेचे खा. रवींद्र गायकवाड यांच्यावर फेडरेशन आॅफ इंडियन एअरलाइन्सने घातलेली विमान प्रवास बंदी हटविण्यासाठी

Gaikwad case pending in parliament | गायकवाड प्रकरणाचे संसदेत पडसाद

गायकवाड प्रकरणाचे संसदेत पडसाद

Next

हरिश गुप्ता / नवी दिल्ली
शिवसेनेचे खा. रवींद्र गायकवाड यांच्यावर फेडरेशन आॅफ इंडियन एअरलाइन्सने घातलेली विमान प्रवास बंदी हटविण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे, केंद्र सरकारने प्रतिसाद न देता गायकवाड यांचे वर्तन स्वीकारण्यासारखे नसल्याचे स्पष्ट केले आहे.
गायकवाड यांच्यावरील विमानबंदीचे सोमवारी संसदेत पडसाद उमटले. शिवसेनेसह अन्य सदस्यांनी हा मुद्दा मांडून बंदी रद्द करण्याच्या मागणीसाठी गदारोळ घातला. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरियन यांनी या मुद्द्यावर घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे सरकारही नमते घेण्याच्या तयारीत नसल्याचे स्पष्ट दिसते.
नागरी उड्डयणमंत्री पी. अशोक गजपती राजू यांनीही गायकवाड यांचे वर्तन स्वीकारार्ह नसल्याचे सांगितल्याने सरकारची भूमिकाही कठोर असल्याचे दिसून आले. एखादा खासदार अशा भानगडीत अडकेल, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते, असे ते म्हणाले. या मुद्यावर लोकसभेध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी शिवसेनेचे खासदार आणि नागरी उड्डयणमंत्री राजू यांच्याशी चर्चाही केली. तथापि, बंदी मागे घेतल्यास चांगला संदेश जाणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
लोकसभेत या मुद्द्यावर शिवसेनेच्या खासदारांनी गोंधळ घातला. खासदाराला संसदेत यावे लागते. ते दरवेळी ट्रेनने प्रवास करू शकत नाहीत. काही वेळा त्यांना विमानाने प्रवास करावा लागतो, वाटल्यास घटनेची चौकशी करा, असे शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ, चंद्रकात खैरे, भावना गवळी यांनी सांगितले. यावर त्या म्हणाल्या की, काय घडले, चूक कोणाची, हा वेगळा मुद्दा आहे. या विषयावरून कामकाज विस्कळीत करू दिले जाणार नाही. मला अधिक बोलण्यास भाग पाडू नका, अशा शब्दांत त्यांनी सुनावले. राज्यसभेतही उपसभापती पी. जे. कुरियन यांनी समाजवादी पार्टीचे नरेश अग्रवाल यांना हा मुद्दा उपस्थित करू दिला नाही. तिथे शिवसेनेच्या एकाही सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केला नाही.
बंदी घालण्याचे स्वातंत्र्य विमान कंपन्यांना आहे. मात्र नियमात दुरुस्तीचा विचार होऊ शकतो. परंतु, गायकवाड प्रकरणाचा वाद विकोपाला गेल्याने इथे तसे करणे अवघड आहे, असे सरकारचे म्हणणे आहे.
अनिश्चित नव्हे, तर मर्यादित काळासाठी विमान प्रवास बंदी घातली जावी, यासंबंधी फेडरेशनशी बोलणी सुरू आहेत. आजन्म बंदी घालता येत नाही. गैरवर्तन केल्याचे आढळून आल्यास प्रवाशावर पुन्हा विमान प्रवासबंदी घालण्याचा इशारा दिला जातो.
भाजपनेही शिवसेनेला स्पष्ट सांगितले की, गायकवाड यांच्या वर्तनामुळे राजकारण्यांची बदनामी झाली असून हा वाद लवकर संपविणे, हेच चांगले राहील. पंतप्रधानांनीही शिवसेनेच्या खासदारांचे म्हणणे ऐकण्याची सूचना धुडकावली आहे. घडल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करून वाद मिटवावा, यासाठी खासदाराला राजी करण्याचे येत असल्याचे समजते.
भाजपला असे वाटते की, हा मुद्या चांगलाच तापला असून शिवसेनाही एकटी पडली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना नेत्यांनी केलेली विधानेही अस्वीकारार्ह आहेत. शिवसेना विश्वासू नाही. राष्ट्रपतीपदाच्या मागच्या दोन निवडणुकीतही शिवसेने एनडीएला पाठिंबा दिला नव्हता. तेव्हा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी ‘मातोश्री’वर बोलणी करणे निरर्थक आहे, असे मोदी सरकारच्या वरिष्ठ मंत्र्याने म्हटले आहे.

कॉमेडियन कपिल शर्मांना एअर इंडिया देणार इशारा
नवी दिल्ली : प्रसिद्ध दूरचित्रवाणी कलावंत कपिल शर्मा यांनी नुकत्याच आॅस्ट्रेलिया-भारत विमानात दारू पिऊ न सुनील ग्रोव्हर यांच्यावर केलेला हल्ला आणि घातलेल्या गोंधळानंतर एअर इंडिया शर्मा यांना इशारा देणार आहे. तो या आठवड्यात दिला जाईल. शर्मा यांनी १६ मार्च रोजी मेलबोर्न- दिल्ली-मुंबई विमानात ग्रोव्हर यांच्यावर बूट फेकला व फटके मारले. सोबत असलेल्यांना शिवीगाळ केली. कपिल शर्मा शोचे कलावंत या विमानाच्या बिझनेस क्लासमधून प्रवास करीत होते.

Web Title: Gaikwad case pending in parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.