टीका झाली म्हणून पद सोडणार नाही - गजेंद्र चौहान
By admin | Published: July 12, 2015 04:23 AM2015-07-12T04:23:37+5:302015-07-12T04:23:37+5:30
नियुक्तीच्या विरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनास चित्रपटसृष्टीबरोबरच इतरांकडूनही वाढता पाठिंबा मिळत असतानाच एफटीआयआयच्या
पुणे : नियुक्तीच्या विरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनास चित्रपटसृष्टीबरोबरच इतरांकडूनही
वाढता पाठिंबा मिळत असतानाच एफटीआयआयच्या (फिल्म अॅण्ड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया) नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनी मात्र स्वत:हून पद सोडण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
गजेंद्र चौहान यांची नियुक्ती रद्द करावी, या मागणीसाठी एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनाला रविवारी एक महिना पूर्ण होत आहे. सिनेसृष्टीसह राजकीय पातळीवरून चौहान यांच्यावर जोरदार हल्लाबोल होत आहे. अनुपम खेर, ऋषी कपूर, रणबीर कपूर, अमोल पालेकर, ज्येष्ठ दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांच्यानंतर आता नाना पाटेकर यांनीही विद्यार्थ्यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवित चौहान यांना बाजूला होण्याचा सल्ला दिला आहे.
माझी नियुक्ती सरकारने केली आहे आणि तेच मला काढू शकतात. सरकारने सांगितले तर मी स्वत:हून पद सोडेन; पण तोपर्यंत माझ्यात जेवढी क्षमता आहे, त्यानुसार मी काम करेन.
- गजेंद्र चौहान,
अध्यक्ष, एफटीआयआय नियामक मंडळ