कडक सॅल्यूट! लग्नानंतर 15 महिन्यांत गलवान व्हॅलीत पती शहीद; लेफ्टनंट होऊन पत्नीने पूर्ण केलं स्वप्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 02:19 PM2022-05-08T14:19:23+5:302022-05-08T14:27:53+5:30
Rekha Singh : शहीद दीपक सिंह यांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आले आहे. यानंतर आता पत्नी रेखा सिंह यांची लेफ्टनंट पदासाठी निवड झाली आहे.
नवी दिल्ली - 15 जून 2020 मध्ये गलवान व्हॅलीत शहीद झालेल्या जवानाची वीरपत्नी रेखा सिंह भारतीय लष्करात लेफ्टनंट झाल्या आहेत. लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीत लान्स नाईक दीपक सिंह शहीद झाले. शहीद दीपक सिंह यांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आले आहे. यानंतर आता पत्नी रेखा सिंह यांची लेफ्टनंट पदासाठी निवड झाली आहे. रीवा जिल्ह्यातील शहीद लान्स नाईक दीपक सिंह यांच्या पत्नीची भारतीय लष्करात लेफ्टनंट म्हणून निवड झाली आहे. आता वैद्यकीय औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर ऑफिसर्स ट्रेनिंग एकडमी, चेन्नई येथे त्यांचं प्रशिक्षण होणार आहे.
रेखा सिंह यांनी लग्नाच्या अवघ्या 15 महिन्यांतच त्यांनी पती गमावल. 15 जून 2020 रोजी गलवान व्हॅलीमध्ये चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत लान्स नाईक दीपक सिंह शहीद झाले होते. वीरपत्नी रेखा सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, "हौतात्म्याचं दु:ख आणि देशप्रेमाच्या भावनेतूनच मी शिक्षिकेची नोकरी सोडून सैन्यात अधिकारी होण्याचा निर्णय घेतला. पण ते सोपं नव्हतं. यासाठी नोएडा येथे जाऊन सैन्यात भरती होण्यासाठी प्रवेश परीक्षेची तयारी केली आणि प्रशिक्षण घेतलं. शारीरिक प्रशिक्षणही घेतलं. मात्र, त्यांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं नाही."
Madhya Pradesh | Rekha Singh, wife of Naik Deepak Singh who was killed in a skirmish with Chinese soldiers in June 2020, has fulfilled her husband's dream of becoming a lieutenant in the Indian Army. (07.05) pic.twitter.com/H1tXDjiXfl
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) May 8, 2022
रेखा म्हणाल्या, "मी हिंमत हारली नाही आणि सैन्यात भरती होण्याची पूर्ण तयारी करत राहिले. दुसऱ्या प्रयत्नात केलेल्या मेहनतीचे फळ मिळालं आणि माझी भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदासाठी निवड झाली आहे. भारतीय लष्करात लेफ्टनंट पदासाठीचे प्रशिक्षण 28 मे पासून चेन्नईत सुरू होणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, एका वर्षात त्यांना भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून काम करावं लागेल."
लग्नापूर्वी रेखा सिंह सिरमौरच्या जवाहर नवोदय विद्यालयात शिकवत होत्या. उच्च शिक्षण घेतलेल्या रेखा यांनी शिक्षिका होऊन समाजसेवा करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. लग्नानंतर पती शहीद दीपक सिंह यांनीही रेखा यांना अधिकारी होण्यासाठी प्रेरित केलं होतं. यामुळे रेखा सिंह यांनी पतीच्या हौतात्म्यानंतर आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प केला. यामध्ये सासरच्या मंडळींनी पूर्ण सहकार्य केलं. पती शहीद झाल्यानंतर रेखा सिंह यांना मध्य प्रदेश सरकारच्या वतीने शिक्षण कर्मचारी वर्ग-2 या पदावर नियुक्ती देण्यात आली होती. त्यांनी आपलं अध्यापनाचं कर्तव्य पूर्ण जबाबदारीनं पार पाडलं. पण सैन्यात भरती होण्याची इच्छा त्यांच्या मनात कायम होती.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी चर्चा केली. रेवा जिल्हा प्रशासन व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांनी सैन्यातील निवडीबाबत योग्य मार्गदर्शन व संवेदनशीलतेनं सहकार्य केले. रेखा सिंह यांनी प्रतिकूल परिस्थितीतही धैर्यानं काम करून आणि अडचणीतही सकारात्मक विचार करून अतुलनीय यश संपादन केलं. आता त्यांनी शहीद पती दीपक सिंह आणि त्यांचं स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं आहे. भारतीय सैन्यातील एक शूर सैनिक म्हणून लान्स नाईक दीपक सिंग यांनी 15 जून 2020 रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी जोरदार मुकाबला केला. लढाईदरम्यान त्यांनी आपल्या साथीदारांसह चिनी सैन्याला माघार घेण्यास भाग पाडलं. मात्र, या संघर्षात मातृभूमीचे रक्षण करताना दीपक सिंह शहीद झाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.