भारताला हादरवण्यासाठी पाकिस्तानचा मोठा कट; जम्मू-काश्मीरमध्ये २०० दहशतवादी घातपाताच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 11:12 AM2021-09-07T11:12:18+5:302021-09-07T11:57:43+5:30
भारतीय सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर; आयएसआयकडून घातपाताचा कट
नवी दिल्ली: अफगाणिस्तानाततालिबानची सत्ता आल्यामुळे सर्वाधिक आनंद पाकिस्तानला झाला आहे. त्यामुळेच अफगाणिस्तानात लवकरात लवकर तालिबानचं सरकार यावं यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयनं प्रयत्न सुरू केले आहेत. तालिबानचं सरकार लवकर स्थापन व्हावं यासाठी आयएसआयचे प्रमुख अफगाणिस्तानात तळ ठोकून आहेत. अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केल्यानं आयएसआएची ताकद वाढली आहे. याचे परिणाम लवकरच जम्मू-काश्मीरमध्ये दिसू शकतात. तशी तयारी आयएसआयनं सुरू केली आहे.
तालिबान हादरला! पंजशीरमधील ५ तळांवर अज्ञात विमानांचा एअरस्ट्राईक
तालिबान सत्तेत येताच आयएसआय ऍक्शनमध्ये
अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता येण्यात आयएसआयचा मोलाचा वाटा आहे. आयएसआयच्या मदतीमुळेच तालिबानला अफगाणिस्तान काबीज करता आला. त्यानंतर आता आयएसआयनं लष्कर-ए-तोएबा, जेईएम आणि अल-बद्रच्या दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरमध्ये पाठवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या २ महिन्यांपासून दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये पाठवले जात आहेत. सध्याच्या घडीला जम्मू-काश्मीरात जवळपास २०० दहशतवादी सक्रीय आहेत. यामध्ये परदेशी आणि स्थानिक दहशतवाद्यांचा समावेश आहे. आयएसआयकडून आदेश मिळताच ते घातपात घडवू शकतात.
तालिबानला विराेध करणारा अखेरचा गड पंजशीर काेसळला
भारतीय यंत्रणा हाय अलर्टवर
आयएसआयचे मनसुबे पाहता भारतीय सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. भारतीय सुरक्षा दलानं सीमा ग्रीड आणखी मजबूत केलं आहे. पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवरील बंदोबस्त वाढवला आहे. सीमेपलीकडून घुसखोरी करणारे दहशतवादी सीमावर्ती गावांमध्ये आश्रय घेतात. त्यांना सहजासहजी आश्रय मिळू नये यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्या आहेत.