"दहशतवादी खूप वाईट आहेत, त्यांनी माझ्या पप्पांना मारलं"; आर्किटेक्टच्या लेकीने फोडला टाहो
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 02:01 PM2024-10-21T14:01:35+5:302024-10-21T14:07:17+5:30
जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू झाला आहे.
जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आर्किटेक्ट शशी भूषण अबरोल यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, पत्नीने करवाचौथचा उपवास ठेवला होता आणि ती व्हिडीओ कॉल करत होती, मात्र शशी यांनी फोन उचलला नाही. याच दरम्यान ५-६ वर्षांची मुलगी आजतकवर रडत म्हणाली की, "दहशतवादी खूप वाईट आहेत, त्यांनी माझ्या पप्पांना मारलं."
टनलमध्ये आर्किटेक्ट/डिझाईनर म्हणून काम करणाऱ्या शशी यांची मुलगी म्हणाली, "जेव्हा आई पूजेसाठी तयार होत होती, तेव्हा माझं पप्पांसोबत थोडा वेळ बोलणं झालं. तू काय करतेस असं त्यांनी मला विचारलं. तेव्ही मी बोलले काही नाही, मग मी फोन आईच्या हातात दिला." हे सांगताना मुलगी आईला प्लीज रडू नकोस असं सांगत होती. यावेळी "दहशतवादी खूप वाईट आहेत, त्यांनी माझ्या पप्पांना मारलं" असं मुलीने रडत रडत म्हटलं.
पत्नीने सांगितलं की, "काल सहा वाजता त्यांच्याशी बोलणं झालं होतं. व्हिडीओ कॉल केला. त्यानंतर मी पुन्हा व्हिडीओ कॉल करेन, असं त्यांना सांगितलं. मग मी रात्रभर फोन करत राहिले, पण त्यांनी फोन उचललाच नाही. दहशतवाद्यांनी सर्वांची घरं उद्ध्वस्त केली. आमचं आता कोणीही नाही."
शशी यांच्या वडिलांनी सरकारकडे मागणी केली की, शशी भूषण यांच्या पत्नीला सरकारी नोकरी मिळावी कारण आता घरात कमावणारं कोणीच नाही. मुलं काय खातील?. शशी यांच्या एका मित्राने ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांनी ७ वर्षे काम केलं, आर्किटेक्ट आहेत. सरकारी मदतीबाबत ते म्हणाले की, आतापर्यंत कोणीही आलेलं नाही. शशी यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे.