गांधी, आंबेडकरांच्या पुतळ्यांची विटंबना, उत्तर प्रदेशात हनुमानाच्या मूर्तीवर चिकटवले पोस्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 01:56 AM2018-03-09T01:56:28+5:302018-03-09T01:56:28+5:30
केरळच्या कन्नूर तालुका कार्यालयाच्या आवारात गुरुवारी सकाळी अज्ञात इसमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केली, तर चेन्नईत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. याखेरीज उत्तर प्रदेशात बलिया जिल्ह्यात हनुमानाच्या मूर्तीची विटंबना केल्याचे उघडकीस आले.
कन्नूर/चेन्नई/बलिया - केरळच्या कन्नूर तालुका कार्यालयाच्या आवारात गुरुवारी सकाळी अज्ञात इसमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केली, तर चेन्नईत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. याखेरीज उत्तर प्रदेशात बलिया जिल्ह्यात हनुमानाच्या मूर्तीची विटंबना केल्याचे उघडकीस आले.
केरळच्या कन्नूरमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या विटंबनेचा प्रकार पाहणा-याने दिलेल्या माहितीनुसार डोक्याला भगव्या रंगाचे मुंडासे बांधलेला इसम कार्यालयाच्या आवारात साडेआठच्या सुमारास आला व त्याने पुतळ्यावर हाताने मारून राष्ट्रपित्यांचा चष्मा तोडला. नंतर त्याने पुतळ्याच्या गळ्यातील हार जमिनीवर फेकला व तेथून निघून गेला. त्याची छायाचित्रे टिपण्यात आली असली तरी त्यात त्याचा चेहरा दिसत नाही. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला शोधण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. विटंबना करणारा इसम उंच होता, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. तो नंतर बसस्थानकाच्या दिशेने निघून गेला.
चेन्नईतील तिरूवोयीत्तूरमधील एका वसाहतीत बसवण्यात आलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यावर रंग ओतण्यात आल्याचेही सकाळी उघडकीस आले. ग्रॅमम स्ट्रीटवर हा प्रकार घडला. तेथील सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना मिळाले असून, त्याआधारे आम्ही संबंधित इसमास अटक करू, असे पोलिसांनी सांगितले.
उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातील खारूव खेड्यात हनुमानाच्या मूर्तीची विटंबना झाल्याचे उघडकीस आल्यावर तणाव निर्माण झाला. महापुरुषांपाठोपाठ देवाच्या मूर्तीची विटंबना झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हनुमानाच्या मूर्तीवर पोस्टर चिकटवण्यात आल्याचे बुधवारी आढळून आले. (वृत्तसंस्था)
सर्वत्र निषेध, निदर्शने
कोलकात्यात जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याची बुधवारी विटंबना करण्यात आली त्याच्या आदल्या दिवशी त्रिपुरामध्ये लेनिन यांचे दोन पुतळे भाजपा कार्यकर्त्यांनी पाडले.
तामिळनाडूच्या वेल्लोर येथे द्रविड चळवळीचे संस्थापक ई. व्ही. रामस्वामी पेरियार यांच्या अर्धपुतळ्याची विटंबना करण्यात आल्यानंतर संपूर्ण राज्यात भाजपाच्या विरोधात निदर्शने झाली. लेनिनचे पुतळे पाडल्याच्या निषेधार्थ हैदराबाद, मुंबई, कोलकातासह विविध शहरांत मोर्चे काढण्यात आले.