नोटांवरूनही गांधी हटविले जातील
By admin | Published: January 15, 2017 04:52 AM2017-01-15T04:52:12+5:302017-01-15T04:52:12+5:30
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या कॅलेंडर व डायरीवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राचा वाद सुरू असतानाच, आता हळूहळू नोटेवरूनही महात्मा गांधींचे छायाचित्र
अंबाला : खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या कॅलेंडर व डायरीवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राचा वाद सुरू असतानाच, आता हळूहळू नोटेवरूनही महात्मा गांधींचे छायाचित्र हटवण्यात येईल, असे वक्तव्य भाजपाचे नेते आणि हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी केले. खादीसाठी महात्मा गांधी यांच्यापेक्षा मोदी हे मोठा ब्रँड आहेत, असेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्याच वादाला तोंड फुटले आहे.
मोदी आणि खादीचे नाते घट्ट आहे. त्यांचे नाव जोडले गेल्यापासून, खादीच्या विक्रीमध्ये १४ टक्के वाढ झाली आहे. खादी ही गांधींची मालकी नाही. गांधींमुळे खादी उत्पादनांमध्ये घसरणच झाली, असे ते उद्गारले. विज नंतर नोटांवरील महात्मा गांधी यांच्या छायाचित्रावरही घसरले. ते म्हणाले की, जेव्हापासून गांधीजी नोटांवर दिसू लागले, तेव्हापासून भारतीय चलनाच्या घसरणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हळूहळू नोटांवरूनही महात्मा गांधी यांचे छायाचित्र काढण्यात येईल. (वृत्तसंस्था)
हिटलर, मुसोलिनीही ब्रँड होते - राहुल
गांधीजींपेक्षा मोदी हे मोठा ब्रँड आहेत, या अनिल विज यांच्या विधानाचा समाचार घेताना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, तसे तर मुसोलिनी आणि हिटलर हे हुकूमशहाही लोकप्रिय ब्रँड होते. पण त्यामुळे त्यांना कोणी मोठे म्हणत नाही.
बाष्कळ वक्तव्य
अनिल विज यांचे हे वक्तव्य बाष्कळ आहे, अशी प्रतिक्रिया महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी दिली. ते म्हणाले की, इतर नेते मनात एक ठेवतात आणि प्रत्यक्षात वेगळे बोलतात. त्या मानाने अनिल विज यांना प्रामाणिकच म्हणायला हवे.
अर्थात नोटांवरून महात्मा गांधी यांचे छायाचित्र काढूनच टाका, किमान त्यामुळे गांधीजींची होणारी बदनामी तरी थांबेल, नोटांचा चुकीच्या कामासाठी राजकारणी वापर करतात, त्यातून काळे धन तयार करतात. अशा ठिकाणी गांधी यांचे नसणेच योग्य ठरेल.
ते भाजपाचे मत नव्हे
विज यांनी केलेली विधाने ही त्यांची वैयक्तिक मते असून, ती भाजपाला मान्य नाहीत, असे पक्षाचे प्रवक्ते श्रीकांत शर्मा यांनी जाहीर केले. ते म्हणाले की, भाजपासाठी गांधी हे देशाचे आयकॉन आहेत व आम्ही गांधीजींचा आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाचा आदरच करत आलो आहोत.
नालायक मुले
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालुप्रसाद यादव यांनी अनिल विज यांच्या विधानावर जोरदार टीका केली आहे. ही देशाची नालायक मुले आहेत, अशी प्रतिक्रिया यादव यांनी व्यक्त केली.