गांधीजींचा लढा प्रेरणादायी - पंतप्रधान
By Admin | Published: October 2, 2016 03:10 PM2016-10-02T15:10:09+5:302016-10-02T15:10:09+5:30
महात्मा गांधी जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मोहीम पुन्हा राबवण्याचे आवाहन केले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ : महात्मा गांधींजींचा गरिबांसाठी केलेले कार्य आणि अन्यायाविरोधात दिलेला लढा हा प्रेरणादायी असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधींजींना आदरांजली वाहिली आहे. महात्मा गांधी जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मोहीम पुन्हा राबवण्याचे आवाहन केले आहे. महात्मा गांधी जयंतीला प्रत्यकाने स्वतः श्रमदान करुन परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी असे आवाहन मोदींनी केले आहे. तसेच या स्वच्छता मोहीमेदरम्यानचे छायाचित्र शेअर करावेत असेही मोदींनी म्हटले आहे. या संदर्भात मोदींनी ट्विटरवर एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे.
देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १४७ व्या जयंतीनिमित्तानं आज देशभरात सर्वत्र आदरांजली वाहण्यात येतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी राजघाटावर जाऊन आदरांजली वाहिली.
आज २ ऑक्टोबररोजी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती आहे. रविवारी सकाळपासूनच राजघाटावर महात्मा गांधीजींना आदरांजली वाहण्यासाठी गांधीजीच्या समाधीजवळ नागरिकांसह नेत्यांचीही गर्दी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे गांधीजी आणि लालबहादूल शास्त्री यांना वंदन केले. यानंतर मोदी राजघाटावर पोहोचले आणि तिथे त्यांनी महात्मा गांधींजीच्या समाधीचे दर्शन घेतले. काही वेळाने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीदेखील राजघाटवर दाखल झाले.