कर्नाटकच्या ईदगाह मैदानावर ना गणेशोत्सव ना नमाज, सुप्रीम कोर्टाचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 08:21 PM2022-08-30T20:21:23+5:302022-08-30T20:29:05+5:30
कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील ईदगाह मैदानावर गणेशोत्सव साजरा करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे.
बंगळुरू: कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील ईदगाह मैदानावर गणेशोत्सव साजरा करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. म्हणजेच या जागेवर ना गणेशपूजा होईल, ना नमाज होईल. ही जमीन जशी आहे, तशीच ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने दोन्ही पक्षांना या प्रकरणाच्या सुनावणीसाठी कर्नाटक उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले आहेत.
Supreme Court says to maintain status quo as of today to be maintained by both sides. https://t.co/K7ZvbDGPkD
— ANI (@ANI) August 30, 2022
विशेष म्हणजे, कर्नाटक उच्च न्यायालयाने चामराजपेठ येथील ईदगाह मैदानाचा वापर करण्याच्या कर्नाटक सरकारच्या अर्जांना परवानगी दिली होती. मात्र, याविरोधात वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. वरिष्ठ अधिवक्ता कपिल सिब्बल यांनी तातडीच्या सुनावणीसाठी या प्रकरणाचा उल्लेख केला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे विनाकारण तणाव निर्माण होईल, असे ते म्हणाले. या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण हाताळण्यासाठी ईदगाह मैदानाभोवती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
#WATCH | Karnataka: Security personnel conduct a flag march near the Eidgah Maidan in Bengaluru's Chamarajpet, ahead of Ganesh Chaturthi. pic.twitter.com/pFk1ExAYq3
— ANI (@ANI) August 30, 2022
1600 पोलिसांचा ताफा तैनात
ईदगाह मैदानाजवळ केलेल्या सुरक्षा व्यवस्थेवर डीसीपी लक्ष्मण बी. निंबर्गी (पश्चिम विभाग) यांनी सांगितले की, गेल्या पंधरा दिवसांपासून कारवाई सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सक्षम आहेत. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सर्व समाजाच्या नेत्यांसोबत शांतता बैठक घेतली. चामराजपेठेत जवळपास 1600 पोलीस तैनात केले आहेत. याशिवाय शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी तीन डीसीपी, 21 एसीपी, सुमारे 49 निरीक्षक, 130 पीएसआय आणि रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात करण्यात आले आहेत.