यमुनाकाठ गणेशमय; राजधानीतील आनंदोत्सवाची उत्साहात सांगता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 05:32 AM2018-09-24T05:32:00+5:302018-09-24T05:32:21+5:30

राजधानीत गेल्या १० दिवसांपासून दिमाखात सुरू असलेल्या आनंदोत्सवाची रविवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने सांगता झाली.

Ganesh visarjan in New Delhi | यमुनाकाठ गणेशमय; राजधानीतील आनंदोत्सवाची उत्साहात सांगता

यमुनाकाठ गणेशमय; राजधानीतील आनंदोत्सवाची उत्साहात सांगता

googlenewsNext

नवी दिल्ली - राजधानीत गेल्या १० दिवसांपासून दिमाखात सुरू असलेल्या आनंदोत्सवाची रविवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने सांगता झाली. ‘गणपती बाप्पा मोरया, अगले बरस तू जल्दी आ’ असा जयजयकार करत दिल्लीकरांनी लाडक्या बाप्पाचे अत्यंत श्रद्धेने विसर्जन केले.
यमुना नदीवरच्या घाटांसह अनेक पाणवठ्यांवर आज सकाळपासून मराठी-अमराठी भाविकांची लगबग होती. गणपती विसर्जन करताना भाविक भक्त आनंदीही होते आणि गणरायाला निरोप देताना भावूकही होत होते. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे आवाहन करणाऱ्या जयघोषामुळे यमुना नदीचा तीर ठिकठिकाणी दुमदुमला होता.
गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश प्रतिष्ठापना झाली. मोठ्या धामधुमीमध्ये गणपतीची अनेक घरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये प्रतिष्ठापना झाली. दहा दिवस बाप्पाला वेगवेगळी पक्वान्ने, मोदक यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक उपक्रम साजरे झाले. आरती, प्रसाद यामुळे गेले १० दिवस आनंदाची लहर दिल्लीकरांमध्ये होती. उत्सवाचा परमोच्च बिंदू असलेल्या गणेश विसर्जनाचा थाट आज आगळाच होता.
यादरम्यान दीड दिवसांच्या, पाच आणि सात दिवस प्रतिष्ठापना केल्या जाणाºया गणपतीचे विसर्जन झाले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनाची परंपरा सर्वाधिक प्रचलित आहे. त्यामुळे आज ११ व्या दिवशी दिल्लीत बाप्पांना त्यांच्या गावी निरोप देण्यासाठी उत्साही लगबग झाली होती. आलिशान मोटारींमध्ये आणि दुचाकीवरून, हातगाड्यांवरूनही लोक गणेशमूर्ती घाटांवर आणत होते. लहान मुले, मुलींनीही फेर धरत, फुगड्या खेळत, ढोलक्याच्या ठेक्यावर नृत्य करत मिरवणुकांमध्ये भाग घेतला. सर्वत्र छोट्या छोट्या मिरवणुका काढत, नाचत गात घरगुती आणि सार्वजनिक उत्सवातील मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सकाळी ७ वाजून ४९ मिनिटे ते १२.१९, दुपारी २ ते ३.३० आणि सायंकाळी ६.३० ते रात्री ११ असे विसर्जनाचे मुहूर्त होते. त्यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत यमुनाकाठ गणेशमय झाला होता.

राष्ट्रीय एकतेचे प्रतीक
गणेशोत्सवाचे केवळ धार्मिक महत्त्व नाही. सांस्कृतिक आणि राष्ट्रीय एकतेचे प्रतीक म्हणूनसुद्धा गणपतीला महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही त्यांच्या शासन काळात संस्कृतीला उत्तेजन देण्यासाठी सार्वजनिक स्वरूपात गणेश पूजन सुरू केले. लोकमान्य टिळक यांनी १८५७ च्या अपयशी क्रांतीनंतर देश एकासूत्रात बांधण्यासाठी हा उत्सव सुरू केला होता.

Web Title: Ganesh visarjan in New Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.