इथे जीवाला धोका, मला मारून टाकतील! POKमधील गँगरेप पीडितेची मोदींकडे मदतीसाठी याचना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 09:29 AM2022-04-14T09:29:03+5:302022-04-14T09:29:28+5:30
पोलीस, राजकीय नेते मला आणि माझ्या लेकराला जीवे मारतील, कृपया मदत करा; पीडितेची मोदींकडे विनवणी
नवी दिल्ली: पाकव्याप्त काश्मीरमधील एका सामूहिक बलात्कार पीडित महिलेनं भारताकडे मदत मागितली आहे. भारतानं आश्रय द्यावा यासाठी मारिया ताहिर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे याचना केली आहे. मारिया ताहीर आणि त्यांच्या मुलाला पाकव्याप्त काश्मीरात धमक्या मिळत आहेत. त्यामुळे त्यांनी भारताकडे मदतीचा हात मागितला आहे.
मी सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडिता आहे. गेल्या ७ वर्षांपासून आम्ही न्यायासाठी लढत आहोत. पाकव्याप्त काश्मीरमधील पोलीस, इथली सरकारं आणि न्यायालय आतापर्यंत मला न्याय देऊ शकलेली नाहीत. त्यामुळे मी तुमच्याकडे मदत मागत आहे, अशा शब्दांत मारिया यांनी पंतप्रधान मोदींकडे मदतीची याचना केली आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी मदतीचं आवाहन केलं आहे.
मला आणि माझ्या मुलाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. इथले पोलीस आणि राजकीय नेते चौधरी तारिक फारुक मला आणि माझ्या मुलाला कधीही संपवून टाकतील. त्यामुळे मला भारतात आश्रय देण्यात यावा, सुरक्षा दिली जावी, अशी विनंती मी पंतप्रधान मोदींकडे करत आहे, असं मारिया यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. २०१५ मध्ये मारिया यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला. या प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी मारिया यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप त्यांना यश आलेलं नाही.
हारुन रशीद, ममून रशीद, जमील शफी, वकास अशरफ, सनम हारुन आणि अन्य तिघांनी माझ्यावर अत्याचार केले. त्यानंतर मी स्थानिक पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यासाठी गेले. मात्र त्यांच्याकडून कोणतंही सहकार्य मिळालं नाही. प्रशासनाला अनेक पत्रं लिहूनही काहीच उपयोग झाला नाही. पीओकेमधील सरन्यायाधीशांना पत्र लिहूनही मारिया यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता मारिया यांनी मोदींकडे विनवणी केली आहे आणि भारतात आश्रय देण्याची मागणी केली आहे.