गंगाआरतीला मोदी गैरहजर राहणार
By admin | Published: May 8, 2014 09:22 AM2014-05-08T09:22:57+5:302014-05-08T12:43:24+5:30
निवडणूक आयोगाने वाराणसीतील सभेसाठी परवानगी नाकारल्याने नाराज झालेल्या मोदींनी आाता गंगाआरतीलाही गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
Next
>ऑनलाइन टीम
वाराणसी, दि. ८ - निवडणूक आयोगाने वाराणसीत सभेसाठी परवानगी नाकारल्याने नाराज झालेल्या नरेंद्र मोदींनी गंगाआरतीला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोग पक्षपातीपणे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
वाराणसीतून निवडणूक लढवणा-या नरेंद्र मोदींना गुरुवारी वाराणसीत डेनिया बाग व अन्य एका ठिकाणी सभा घ्यायची होती. मात्र निवडणूक अधिकारी प्रांजल यादव यांनी मोदींच्या डानिया बाग येथील सभेला परवानगी नाकारली व मोदी - निवडणूक आयोगात नवीन वाद निर्माण झाला. मोदी वाराणसी घाटावर गंगाआरतीला हजर राहणार होते. मात्र गुरुवारी सकाळी मोदींनी गंगाआरतीला उपस्थित राहणार नाही अशी माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. 'राजकारणापेक्षा आई श्रेष्ठ असते हे काही लोकांना समजले असते तर बरे झाले असते' असा त्यांनी ट्विटमध्ये म्हटले असून आरतीला अनुपस्थित राहणार असल्याने मी गंगामाईची माफी मागतो असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, अरुण जेटली व अमित शहा मोदींना परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करणार आहेत.
दरम्यान, मोदींच्या या कृतीविरोधात अरविंद केजरीवाल यांनी टीका केली आहे. मोदींना आरतीसाठी परवानगी दिली होती. पण राजकीय फायदा घेण्यासाठीच ते आता आरतीमध्ये सहभागी होत नाही असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.