गंगा नदी कधीच दूषित होत नाही, हे 3 घटक ठेवतात स्वच्छ; संशोधनातून समोर आली माहिती...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 15:54 IST2025-02-04T15:53:28+5:302025-02-04T15:54:58+5:30
'राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी आणि संशोधन संस्थे'ने 12 वर्षे केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे.

गंगा नदी कधीच दूषित होत नाही, हे 3 घटक ठेवतात स्वच्छ; संशोधनातून समोर आली माहिती...
Ganga River : हजारो वर्षांपासून भारतातील विविध राज्यांमधून वाहणारी गंगा नदी कोट्यवधी भारतीयांसाठी जीवनदायिनी आहेच, शिवाय तिला धार्मिक महत्त्वही तेवढेच आहे. अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये गंगा नदीचा उल्लेख आढळतो. हिंदूंसाठी गंगाजल अत्यंत पवित्र आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी लाखो भाविक गंगेत स्नान करुनही गंगेचे पाणी कधीच खराब होत नाही. हे पाणी इतके स्वच्छ कसे राहते, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. एका अभ्यासातून महत्वाची माहिती समोर आली आहे.
हिमालयातून उगम पावणारी गंगा नदी हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. गंगेचे पाणी अनेक महिने साठवता येते. ते खराब होत नाही. इतकेच नव्हे तर धार्मिक उत्सवांमध्ये दरवर्षी लाखो भाविक स्नान करतात, तरीही यातून साथीचा रोग किंवा इतर रोग पसरत नाही. विशेष म्हणजे, गंगा तिच्यात असलेल्या तीन घटकांमुळे स्वच्छ राहते.
स्वतःला स्वच्छ ठेवण्याचा गुण
‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग अँड रिसर्च’च्या (NIEERI) शास्त्रज्ञांनी गंगा नदीवर संशोधन केले. यातून गंगेच्या पाण्यात स्वतःला स्वच्छ ठेवण्याची गुणवत्ता असल्याचे समोर आले. गंगेच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात 'बॅक्टेरियोफेज' असते, जे गंगेचे पाणी प्रदूषित होण्यापासून रोखते. केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ गंगा मिशन’ अंतर्गत निरीचे संशोधक डॉ. कृष्णा खैरनार यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनासाठी गंगा तीन टप्प्यात विभागली गेली. पहिला गोमुख ते हरिद्वार, दुसरा हरिद्वार ते पाटणा आणि तिसरा पटना ते गंगासागर.
50 वेगवेगळ्या ठिकाणचे नमुने
डॉ. खैरनार यांनी सांगितल्यानुसार, संशोधकांनी 50 वेगवेगळ्या ठिकाणांहून गंगाजल आणि नदीच्या पात्रातील वाळू आणि मातीचे नमुने घेतले. संसोधकांना आढळले की, गंगा नदीमध्ये स्वतःला शुद्ध करण्याचे गुणधर्म आहेत. संशोधकाने गेल्या कुंभमेळ्यातही नमुने गोळा केले होते. संशोधकांना गंगेच्या पाण्यात बॅक्टेरियोफेजेस आढळले, जे पाण्यातील जंतू नष्ट करतात. यामुळे गंगा कधी दूषित होत नाही.
ऑक्सिजनचे भरपूर प्रमाण
डॉ. खैरनार पुढे म्हणाले की, यासोबतच गंगेच्या पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण खूप जास्त असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. गंगेच्या पाण्यात ऑक्सिजनची पातळी 20 मिलीग्राम प्रति लिटरपर्यंत आहे. यासोबतच टेरपीन नावाचे फायटोकेमिकलही सापडले. ही तीन तत्त्वे गंगेचे पाणी शुद्ध ठेवतात. यामुळे गंगेचे पाणी कधीच खराब होत नाही. विशेष म्हणजे, संशोधकांनी यमुना आणि नर्मदा नद्यांच्या पाण्यावरही संशोधन केले. मात्र, या नद्यांच्या पाण्यात गंगेच्या पाण्यात असलेले घटक अत्यंत कमी प्रमाणात असल्याचे समोर आले आहे.
गंगेवरील संशोधन 12 वर्षे चालले
सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ 2025 चे आयोजन केले जात आहे. महाकुंभत दररोज लाखो भाविक गंगेत स्नान करतात. मात्र गंगेचे पाणी पाच किलोमीटर अंतरापर्यंत गेल्यावर आपोआप शुद्ध होते. गंगेतील तीन घटक नदीला लगेच शुद्ध करतात. संशोधकांनी 12 वर्षांच्या मेहनतीतून आणि संशोधनातून ही महत्वाची बाब शोधून काढली आहे.