गँगस्टर छोटा राजनची अटक म्हणजे ‘नुरा कुस्ती’
By admin | Published: October 28, 2015 02:32 AM2015-10-28T02:32:18+5:302015-10-28T02:32:18+5:30
गँगस्टर छोटा राजनला बाली येथे अटक होणार हे सरकारच्या महत्त्वपूर्ण पदांवरील बडे अधिकारी आणि मंत्र्यांना आधीच माहीत होते. त्याबाबत संकेतही दिले गेल्याचे उघड झाले आहे.
शीलेश शर्मा, नवी दिल्ली
गँगस्टर छोटा राजनला बाली येथे अटक होणार हे सरकारच्या महत्त्वपूर्ण पदांवरील बडे अधिकारी आणि मंत्र्यांना आधीच माहीत होते. त्याबाबत संकेतही दिले गेल्याचे उघड झाले आहे.
सरकार व राजन यांच्यातील नुरा कुस्तीची ही निष्पत्ती असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.
३० सप्टेंबर रोजी प्रस्तुत प्रतिनिधीने एका ज्येष्ठ मंत्र्याची भेट घेतली
असता त्यांनी आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सरकार एखाद्या मोठ्या बातमीला दुजोरा देऊ शकते असे म्हटले होते. खरेतर छोटा राजनला अटक त्याचवेळी होणार होती, मात्र त्याबाबत व्यूहरचना करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपले डावपेच आणखी काही दिवसांसाठी लांबणीवर टाकले होते. छोटा राजनला अटक करण्यात आलेल्या यशाकडे लक्ष वेधत बिहारच्या निवडणुकीत राजकीय लाभ मिळवण्याची रालोआची इच्छा होती; मात्र औपचारिकरीत्या कोणताही अधिकारी किंवा मंत्री त्याबाबत दुजोरा द्यायला तयार नव्हता. सदर मंत्र्याने दिलेले संकेत पाहता त्यावर विश्वास न ठेवण्याचे कारणही दिसत नाही.
कदाचित गुपितावरील पडदा उघडला जाणारही नाही; मात्र सध्या छोटा राजन गंभीर आजाराशी झुंजत आहे. त्याला भारतात उपचार करायचे आहेत. तो भारतात पोहोचताच त्याला उपचार सुविधा उपलब्ध करवून दिल्या जातील. राजन याने स्वत:हून अटक करवून घेतली की खरेच त्याला इंटरपोलने जाळ्यात अडकवले, हा सवालही या पार्श्वभूमीवर उपस्थित होत आहे.
डोवाल यांच्या इंडोनेशिया भेटीशी संबंध
छोटा राजन केवळ भारतीय तपास संस्थांच्या संपर्कातच नव्हता तर दाऊदला अटक करण्यासाठी माहिती पुरविण्याचे काम करीत होता, तथापि आजपर्यंत त्याला पुष्टी मिळू शकली नव्हती.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा इंडोनेशिया दौरा आणि त्यानंतर छोटा राजनने बाली येथे पोहोचणे अकस्मात घडले नाही. तो बाली येथे पोहोचणार असल्याचे सरकारला माहीत असेल तर तपास संस्था त्याच्या संपर्कात होत्या काय? हा मुद्दा एक रहस्य बनून समोर आला आहे.