गँगस्टर मुस्तफा डोसाने कोर्टाच्या आवारातच घेतल्या मॉडेल्सच्या 'ऑडिशन्स'
By Admin | Published: May 28, 2015 05:15 PM2015-05-28T17:15:56+5:302015-05-28T17:53:45+5:30
कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा निकटचा साथीदार आणि १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटातील आरोपी मुस्तफा डोसाने चक्क कोर्टाच्या आवारातच काही मॉडेल्सच्या 'ऑडिशन्स' घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा निकटचा साथीदार आणि १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटातील आरोपी मुस्तफा डोसाने चक्क कोर्टाच्या आवारातच काही मॉडेल्सच्या 'ऑडिशन्स' घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दुबईस्थित एका ज्वेलरी शॉपसाठी मॉडेलिंग करण्यासाठी मुस्तफाने या महिन्याच्या सुरूवातीस सत्र न्यायालयाच्या आवारात सुमारे १२ मॉडेल्सची ऑडिशन घेतली. मुस्तफासारखा कुख्यात गुंड कोर्टाच्या आवारातच खुलेआम ऑडिशन घेत असेल तर तो तितक्याच सहज निसटूही शकतो त्यामुळे हा प्रकार अतिशय धोकादायक असल्याचे मत व्यक्त होत आहे. तसेच पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्तफा डोसाने ऑडिशननंतर तीन जणींची अंतिम निवड केली आणि त्यांना अॅडव्हान्स म्हणून काही रक्कम दिली. मात्र निवड झालेल्यांपैकी एका मॉडेलला तोतया पोलिसांनी दादर परिसरात रोखून तिच्याकडील रोख रक्कम व तिचा मोबाईल जप्त केला. तसेच या कारवाईनंतर त्या पोलिसांपैकी एकाने या मॉडेललाचौकशीसाठी क्राईम ब्राँचच्या कार्यालयात येण्यास सांगितले. काही दिवसांनी ती मॉडेल अँटॉप हिल येथील क्राईम ब्रांचच्या कार्यालयात पोचली असता आपल्याकडून रोख रक्कम घेणा-यांपैकी एकही व्यक्ती क्राईम ब्रांचसाठी काम करणारी नसून ते तोतया पोलिस असल्याचे तिच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर तिने माहिम पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब सूत्रे फिरवत त्या तोतया अधिका-यांचा कसून शोध घेण्यास सुरूवात केली आणि तीन जणांना अटक केली.
दरम्यान याप्रकरणी पोलिस पुढे काय कारवाई करतात, मुस्तफाला ऑडिशन घेण्याची परवानगी कशी मिळाली, या सर्व प्रकरणाची चौकशी तरी होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.