गांगुलीने पदाचा आदर राखायला हवा होता
By admin | Published: June 29, 2016 05:53 AM2016-06-29T05:53:05+5:302016-06-29T05:53:05+5:30
भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड न झाल्यामुळे निराश झालेले संघाचे माजी संचालक रवी शास्त्री यांनी मंगळवारी सौरभ गांगुलीवर टीका केली.
नवी दिल्ली : भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड न झाल्यामुळे निराश झालेले संघाचे माजी संचालक रवी शास्त्री यांनी मंगळवारी सौरभ गांगुलीवर टीका केली. प्रशिक्षकपदासाठी मुलाखत घेण्याची जबाबदारी सोपविलेल्या गांगुलीने आपल्या पदाचा आदर राखायला हवा, असे शास्त्री यांनी म्हटले आहे. शास्त्रीच्या मुलाखतीच्या वेळी गांगुली उपस्थित नसल्याचे वृत्त आहे.
मुलाखतीच्या वेळी गैरहजर राहणाऱ्या गांगुलीवर टीका करताना शास्त्री म्हणाले, ‘भविष्यात अशा प्रकारच्या महत्त्वाच्या पदासाठी कुणाची मुलाखत घ्यायची असेल तर त्याने उपस्थित असावे,’ असे सांगितले.
शास्त्री म्हणाले, ‘मी नाराज नाही. मी केवळ निराश झालो. याच्याशी सौरवचे काही घेणे-देणे नाही; पण त्या व्यक्तीने मुलाखतीसाठी उपस्थित असलेल्या व्यक्तींचा अपमान केला. आपल्या पदाचा आदर राखला नाही.’
अनिल कुंबळे यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आल्याच्या निर्णयाची प्रशंसा करताना शास्त्री म्हणाले, ‘वैयक्तिक विचार करता गेल्या १८ महिन्यांत जे काही चांगले कार्य केले भविष्यातही ते कायम राखण्यास उत्सुक असल्यामुळे निराश झालो.’ गांगुलीला काय सल्ला देणार, याबाबत बोलताना शास्त्री म्हणाले, ‘भविष्यात अशा महत्त्वाच्या पदासाठी मुलाखत घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली, तर त्या वेळी नक्कीच उपस्थित राहावे.’ बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि
क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य असलेल्या गांगुलीच्या प्रकरणात हितसंबंध जोपासल्याचा मुद्दा उपस्थित होतो का, याबाबत मात्र त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. (वृत्तसंस्था)