गणपती बाप्पाच्या लाडूचा 30 लाख रुपयांना लिलाव, भाजप नेत्यानं लावली बोली; काय आहे यात खास?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 06:07 PM2024-09-17T18:07:42+5:302024-09-17T18:08:45+5:30
तेलंगणातील बाळापूर गणेश मंदिरातील लाडूंच्या लिलावात मंगळवारी 30.1 लाख रुपयांची विक्रमी बोली लावली गेली. येतील गणेश उत्सवाचे एक प्रमुख ...
तेलंगणातील बाळापूर गणेश मंदिरातील लाडूंच्या लिलावात मंगळवारी 30.1 लाख रुपयांची विक्रमी बोली लावली गेली. येतील गणेश उत्सवाचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे, हा लिलाव दरवर्षी बाळापूर गणेश मूर्ती विसर्जनासाठी निघताना होतो. यावेली सर्वाधिक बोली भाजप नेते कोलानू शंकर रेड्डी यांनी लावली.
शहराच्या इतर भागातही विविध गणपती मंदिरांत अशा प्रकारचा लिलाव करण्यात आला. बाळापूर गणेश मंदिरातील लाडूंच्या लिलावात अनेक महत्वाच्या राजकीय नेत्यांनी आणि व्यापाऱ्यांनी भाग घेतला होता. महत्वाचे म्हणजे, 2023 मध्ये बाळापूर मंदिरातील लाडूचा लिलाव 27 लाख रुपयांना झाला होता. दरम्यान, रंगारेड्डी जिल्ह्यातील बंदलागुडा नगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या कीर्ती रिचमंड विला येथील आणखी एका लाडूचा लिलावात 1.87 कोटी रुपयांची बोलील लागली होती. ही बोली गेल्यावेळच्या बोलीच्या तुलनेत 67 लाख रुपयांनी अधिक राहिली.
लाडू लिलावाची ही परंपरा 1994 मध्ये सुरू झाली. हा लाडू आमच्यासाठी अत्यंत लकी असल्याचे येथील लोकांची म्हणणे आहे. हा लाडू, धन, समृद्धी आणि सौभाग्यासोबतच चांगले आरोग्यही देतो. दरवर्षी मूर्ती विसर्जनापूर्वी या लाडूचा लिलाव केला जातो आणि यातून जो काही पैसा उभा राहतो तो विकासकामांसाठी वापरला जातो.