संस्कारी व देशभक्त मुले जन्मण्यासाठी ‘गर्भसंस्कार’; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभियान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 05:49 AM2023-06-11T05:49:57+5:302023-06-11T05:50:17+5:30
गर्भवती महिलांना भगवद्गीता व रामायण यांचे वाचन तसेच संस्कृत मंत्रांचे उच्चारण व योग करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) राष्ट्रसेविका समितीने देशभर ‘गर्भसंस्कार’ अभियान सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. मुले संस्कारी व देशभक्त जन्मावीत यासाठी गर्भवती महिलांना भगवद्गीता व रामायण यांचे वाचन तसेच संस्कृत मंत्रांचे उच्चारण व योग करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.
राष्ट्रसेविका समितीअंतर्गत काम करणाऱ्या ‘संवर्द्धनी न्यासा’च्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, संपूर्ण वैज्ञानिक पद्धतीने गर्भसंस्कार कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. मूल गर्भात असल्यापासून ते दोन वर्षांचे होईपर्यंत त्याच्यावर संस्कार केले जातील. न्यासाने सांगितले की, नॉर्मल डिलिव्हरी व्हावी यासाठी महिलांना योग्य आराम आणि योग यांची माहिती दिली जाईल. सिझेरिअन डिलिव्हरी टाळण्यासाठी आवश्यक उपाय महिलांना सांगितले जातील.
नेमके काय करणार?
संवर्द्धनी न्यासाच्या डॉक्टरांची पथके या मोहिमेची देशभरात अंमलबजावणी करतील. त्यासाठी देशाचे पाच भाग करण्यात आले आहेत. प्रत्येक भागात १० डॉक्टरांचे पथक कार्यक्रमाची अंमलबजावणी करील. प्रत्येक डॉक्टर आपल्या क्षेत्रातील २० गर्भवती महिलांना गर्भसंस्कार योजनेशी जोडेल.
गर्भासाठी चांगले काय?
पवित्र आणि वैज्ञानिक पद्धतीने गर्भात वाढणाऱ्या मुलास भारतीय संस्कृती आणि मूल्ये तसेच इतिहासाची माहिती दिली जाईल. गर्भवती महिला व त्यांच्या परिवारास सात्त्विक जेवण व चांगल्या वातावरणाची माहिती दिली जाईल. मंत्र संस्कृतात असल्यामुळे गर्भातील बाळासाठी लाभदायक आहेत. त्यामुळे बाळाचा पूर्ण विकास होतो. चार महिन्यांच्या गर्भातील बाळ ऐकणे सुरू करते, असे आता शास्त्रज्ञही मानतात, असे न्यासाने सांगितले.