गरजू झाले माळी अन् चाैकीदार; वर्षभरात देशात १.७६ कोटी रोजगार मिळाल्याचा खासगी संस्थेचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 01:31 PM2024-05-20T13:31:34+5:302024-05-20T13:32:20+5:30
देशात नोकऱ्या वाढल्याचे हे प्रमाण आर्थिक वर्ष २०१७-१८ नंतर सर्वाधिक असल्याचा दावा सीएमआयईने केला आहे. शेती आणि सेवा क्षेत्राने मिळून सर्वाधिक ३५ ते ४० टक्के नोकऱ्या दिल्या आहेत. उद्योगांनी दिलेल्या नोकऱ्यांचे प्रमाण २५ टक्के इतके आहे.
नवी दिल्ली : देशात निवडणुकीमुळे राजकीय पक्षांकडून नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले जात असतानाच बेरोजगारी घटल्याचे समोर आले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात १.७६ कोटी लोकांच्या हातांना काम मिळाल्याचे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेच्या अहवालातून हे समोर आले.
देशात नोकऱ्या वाढल्याचे हे प्रमाण आर्थिक वर्ष २०१७-१८ नंतर सर्वाधिक असल्याचा दावा सीएमआयईने केला आहे. शेती आणि सेवा क्षेत्राने मिळून सर्वाधिक ३५ ते ४० टक्के नोकऱ्या दिल्या आहेत. उद्योगांनी दिलेल्या नोकऱ्यांचे प्रमाण २५ टक्के इतके आहे.
प्रमाण ४.३ टक्क्यांनी वाढले
२०२२-२३ या आर्थिक वर्षात देशात नोकरी करणाऱ्यांची एकूण संख्या ४०.५७ कोटी इतकी होती. तर, २०२३-२४ मध्ये हीच संख्या वाढून ४२.३३ कोटी इतकी झाली आहे, असे अहवालात म्हटले आहे. या वर्षभराच्या कालावधीत नव्या नोकऱ्यांचे प्रमाण जवळपास ४.३ टक्क्यांनी वाढल्याचे अहवालात म्हटले आहे.
गैर-व्यावसायिक सेवांचा वाटा वाढला
- सीएमआयईच्या आकडेवारीनुसार सेवा क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये गैर-व्यावसायिक सेवांचा वाटा २०२२-२३ मध्ये १३.६ टक्के इतका होता.
- २०२३-२४ मध्ये यात वाढ होऊन हे प्रमाण १८.१ टक्के इतके झाले आहे. २०२०-२१ मध्ये हे प्रमाण २०.२ टक्के इतके होते तर २०२२-२३ मध्ये यात घट होऊन १६.६ टक्के इतके झाले आहे.
कुणी दिल्या व कुणी घेतल्या कोणत्या नोकऱ्या?
सेवा क्षेत्रातील तेजीमुळे रोजगारांच्या निर्मितीला बळ मिळाले आहे. सेवा क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये या काळात विक्रमी वाढ झाली. नोकऱ्यांमध्ये २०२२-२३ मध्ये सेवा क्षेत्राने ३६.६ टक्के रोजगार दिल्याचे दिसते. सेवा क्षेत्रातील ७० टक्के कर्मचारी पर्यटन, हॉटेल, किरकोळ विक्री व्यवसाय आणि बिगर व्यावसायिक सेवांमध्ये कार्यरत आहेत.