शहीद कमांडोच्या बहिणीच्या लग्नात गरूड कमांडोंनी जे केलं, ते पाहून सलामच ठोकाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 05:52 PM2019-06-14T17:52:52+5:302019-06-14T17:54:04+5:30

गरूड कमांडो ज्योती प्रकाश निराला यांना जम्मू-काश्मीरमधील चकमकीत वीरमरण आलं होतं.

Garud Commandos donated Rs 5 lacs for Shahid Commando JP Nirala sister's marriage | शहीद कमांडोच्या बहिणीच्या लग्नात गरूड कमांडोंनी जे केलं, ते पाहून सलामच ठोकाल!

शहीद कमांडोच्या बहिणीच्या लग्नात गरूड कमांडोंनी जे केलं, ते पाहून सलामच ठोकाल!

googlenewsNext

संपूर्ण देश हे आपलं कुटुंब मानून त्यांच्या रक्षणासाठी लष्कराचे जवान सीमेवर प्राणांची बाजी लावून लढत असतात. त्यामुळे एखादा जवान शहीद होतो, तेव्हा त्याच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी, मदतीसाठी ठामपणे उभं राहणं, हे आपलं कर्तव्यच आहे. ही कृतज्ञतेची जाणीव प्रत्यक्ष कृतीत उतरवत भारतीय वायुसेनेच्या गरूड कमांडोंनी शहीद ज्योती प्रकाश निराला यांच्या बहिणीच्या लग्नात भावंडांची जबाबदारी अगदी चोख बजावली. या लग्नातील एक फोटो व्हायरल झाला असून तो पाहून कमांडोंबद्दलचा आदर नक्कीच दुणावतो. 

गरूड कमांडो ज्योती प्रकाश निराला यांना जम्मू-काश्मीरमधील चकमकीत वीरमरण आलं होतं. परंतु, मृत्यूपूर्वी त्यांनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या पराक्रमासाठी त्यांना देशातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार - अशोक चक्र (मरणोत्तर) प्रदान करण्यात आलं होतं. २०१८च्या प्रजासत्ताक दिनी निराला यांच्या आईनं हा सन्मान स्वीकारला होता. त्यांना गौरवताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही अश्रू अनावर झाले होते. त्यानंतर आता, शहीद जेपी निराला यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या हौतात्म्याला आगळ्या पद्धतीने सलाम केला आहे. 

निराला कुटुंबाचा आर्थिक भार प्राधान्याने ज्योती प्रकाश यांच्याच खांद्यावर होता. स्वाभाविकच, त्यांच्या हौतात्म्यानंतर कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली. अशात चार बहिणींपैकी एकीचं लग्न ठरलं. पैसे उभे करणं हे मोठं आव्हानच होतं. ही गोष्ट गरूड कमांडोंना कळली. तेव्हा, आपल्या सहकाऱ्याची बहीण ती आपली बहीण, या नात्याने सगळे एक झाले आणि प्रत्येकी ५०० रुपये जमा करत त्यांनी ५ लाख रुपयांचा निधी उभा केला. त्यातून ज्योती प्रकाश यांच्या बहिणीचं लग्न व्यवस्थित होऊ शकलं. 

या लग्नसोहळ्यानंतर कमांडोंनी बहिणीला वेगळा मान दिला. या नववधूची पावलं जमिनीवर पडू नयेत म्हणून त्यांनी आपले तळहात पुढे केले. त्यावरून चालत चालत बहिणीनं आपल्या नव्या प्रवासाची सुरुवात केली. त्यांनी दिलेला हा आदर पाहून अनेकांना गहिवरून आलं. पण, या कमांडोंनी आपल्या मित्राला वाहिलेली ही आगळी श्रद्धांजलीच होती.

हा फोटो उद्योगपती हर्ष गोयंका यांनी ट्विट केला असून तो हजारो नेटिझन्सनी 'लाईक' केलाय. या फोटोच्या निमित्ताने, शहीद जवानांच्या कुटुंबीयांवर ओढवणाऱ्या आर्थिक संकटाचा विषय पुन्हा प्रकाशात आला आहे. 


शहीद जेपी निराला यांच्या कुटुंबाला आर्थिक आधाराची गरज असून त्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन काही महिन्यांपूर्वी काही स्वयंसेवी संस्थांच्या वेबसाईटवरून करण्यात आलं होतं. देशवासीयांनीही या सादेला चांगला प्रतिसाद दिला आहे. 

 

Web Title: Garud Commandos donated Rs 5 lacs for Shahid Commando JP Nirala sister's marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.