उत्तर प्रदेशातल्या IFFCOच्या प्लांटमध्ये वायू गळती; दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू
By कुणाल गवाणकर | Published: December 23, 2020 09:27 AM2020-12-23T09:27:30+5:302020-12-23T09:28:53+5:30
१५ कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयांमध्ये उपचार सुरू
प्रयागराज: उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील फुलपूर येथील इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेडच्या (IFFCO) प्लांटमध्ये मंगळवारी रात्री मोठा अपघात झाला. इफ्फ्कोच्या प्लांटमधील युरिया उत्पादन युनिटमध्ये अमोनिया गॅसची गळती झाली. यामुळे दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. तर १५ कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली. त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. वायू गळतीचं प्रमाण मोठं असल्यानं आणखी कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे.
फुलपूरमधील इफ्फ्कोच्या प्लांटमध्ये मंगळवारी रात्री उशिरा अमोनिया वायूची गळती सुरू झाली. युरियाची निर्मिती करणाऱ्या विभागांमध्ये हा प्रकार घडला. त्यावेळी रात्र पाळीतील कर्मचाऱ्यांचं काम सुरू होतं. साडे अकराच्या सुमारास वायू गळती सुरू झाली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. कर्मचारी बाहेरच्या दिशेनं पळू लागले. वायू गळतीमुळे सहाय्यक व्यवस्थापक व्ही. पी. सिंह आणि उपव्यवस्थापक अभयनंदन यांचा मृत्यू झाला. तर १५ कर्मचारी बेशुद्ध पडले.
15 employees of IFFCO plant at Phoolpur fall ill following gas leakage, admitted to hospital: Prayagraj DM Bhanu Chandra Goswami
— ANI UP (@ANINewsUP) December 23, 2020
(Visuals from the hospital where the patients are admitted) https://t.co/OFnIt4nN3Cpic.twitter.com/UfIQcbDjaM
वायू गळतीची माहिती मिळताच अधिकारी आणि पोलिसांनी त्यांनी घटनास्थळ गाठलं. बेशुद्ध पडलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीनं बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आलं. सहाय्यक व्यवस्थापक व्ही. पी. सिंह आणि उपव्यवस्थापक अभयनंदन यांची प्रकृती जास्त गंभीर होती. त्यांच्यावर रुग्णालयात त्वरित उपचार सुरू करण्यात आले. मात्र काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. आता वायू गळती रोखण्यात यश आलं असून या संपूर्ण घटनेची चौकशी होणार आहे.