गॅस पाईपलाईनने उद्योगांना लाभ मिळणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 01:44 AM2020-09-14T01:44:28+5:302020-09-14T01:49:34+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ९०० कोटी रुपये खर्चाच्या गॅस पाइपलाइन योजनेचे उद्घाटन केले.
नवी दिल्ली : बिहारमधील गॅस पाईपलाईन योजनेमुळे राज्यातील लोह, खते आणि वीज उत्पादन या उद्योगांना लाभ मिळणार असून, राज्यातील वाहतुकीसाठी सीएनजीसारखे स्वच्छ इंधन उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. गॅस आधारित उद्योगांच्या आगमनामुळे राज्यामध्ये रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ९०० कोटी रुपये खर्चाच्या गॅस पाइपलाइन योजनेचे उद्घाटन केले. त्यावेळी बोलताना पंतप्रधानांनी वरील प्रतिपादन केले. या योजनेमध्ये पारादीप-हल्दिया-दुर्गापूर पाइपलाइन योजना तसेच दोन एलपीजी बॉटलिंग प्लॅँटचा समावेश आहे.
या नव्या प्रकल्पामुळे राज्यात पाइपलाइनद्वारे गॅसचे वहन होणार असून, त्याचा लाभ विविध प्रकारच्या उद्योगांना होणार असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला बिहारचे राज्यपाल फागू चौहान, मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मंेद्र प्रधान , केंद्रीय दळणवळणमंत्री रविशंकर प्रसाद, केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, डेअरी, पशुपालन मंत्री गिरीराज सिंह आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या मालकीच्या असलेल्या इंडियन आॅइल कॉर्पाेरेशन तसेच हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पाेरेशन यांनी या दोन योजना तयार केल्या आहेत.
योजना पूर्ण होण्याच्या कालावधीत घट
बिहारसाठी देण्यात आलेल्या विशेष पॅकेजअंतर्गत येथील पायाभूत सुविधा भक्कम करण्यावर भर देण्यात आला आहे. अडीच वर्षांपूर्वी या योजनेचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य मला मिळाले होते. आज ही योजना पूर्ण होऊन तिचे उद््घाटन मला करता आले, ही समाधानाची बाब असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. पूर्वी योजना पूर्ण होण्यासाठी एक पिढी पुढे जात असे. आता ही परिस्थिती बदलली आहे, ही अतिशय चांगली बाब असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.