गॅस सबसिडीतही घोटाळा, २६३ ग्राहकांचे अनुदान एकाच बँक खात्यावर
By admin | Published: June 18, 2015 03:03 PM2015-06-18T15:03:56+5:302015-06-18T15:12:43+5:30
एलपीजी गॅस सिलेंडरचे अनुदान थेट बँकेत जमा करण्याच्या योजनेतही भ्रष्टाचार झाल्याची घटना समोर आली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. १८ - एलपीजी गॅस सिलेंडरचे अनुदान थेट बँकेत जमा करण्याच्या योजनेतही भ्रष्टाचार झाल्याची घटना समोर आली आहे. गॅस वितरक एजन्सीत काम करणा-या कर्मचा-याने तब्बल २६३ ग्राहकांचे अनुदान स्वतःच्या खात्यात जमा केल्याचे समोर आले असून ही रक्कम २० लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचे निष्पन्न झाले आहे.
इंडियन ऑइलकडे उत्तरप्रदेशमधील गोरखपूरमध्ये एलपीजी गॅस अनुदानातील गोंधळाबाबत असंख्य तक्रारी येत होत्या. याची दखल घेत इंडियन ऑइलने सखोल चौकशी केली. या चौकशीत सरयू इंडेन गॅस एजन्सीत काम करणा-या राहुल नामक तरुणाने २६३ गॅस ग्राहकांची माहिती भरताना स्वतःच्या बँक खात्याचा नंबर अपलोड केल्याचे उघड झाले. फेब्रुवारी ते मे या कालावधीत राहुलच्या खात्यात तब्बल २० लाख रुपये जमा झाले असून इंडियन ऑइलने राहुलचे बँक खाते गोठवले आहे. उत्तरप्रदेशमधील अन्य जिल्ह्यांमधूनही अशा तक्रारी आल्याने सर्व जिल्ह्याच्या विभागीय अधिका-यांना चौकशीचे आदेश दिल्याचे इंडियन ऑइलचे उत्तरप्रदेशमधील उपमहाप्रबंधक पी के झा यांनी स्थानिक वृत्तपत्राला सांगितले. जुलैपर्यंत या सर्व तक्रारींचा चौकशी अहवाल येईल व त्यानंतर संबंधीतांवर कारवाई करु असे झा यांनी स्पष्ट केले.
एलीपी गॅस सिलेंडरच्या अनुदानात भ्रष्टाचाराचे प्रकरण उत्तरप्रदेशसोबतच अन्य राज्यांमध्येही सुरु असल्याचा संशय आहे. पाटणा येथील एका गॅस एजन्सीतील ५०० ग्राहकांचे अनुदान एकाच बँक खात्यात जमा होत असल्याचे समजते. इंडियन ऑइलमधील सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार देशभरातील १२ हजार ग्राहकांचे अनुदान भलत्याच बँक खात्यांमध्ये जमा होत आहे. सखोल चौकशीनंतर हा आकडा लाखांपर्यंत जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे.