गेट! सेट! व्होट!
By admin | Published: October 7, 2014 05:26 AM2014-10-07T05:26:34+5:302014-10-07T05:26:34+5:30
मतदार जागृती आणि शिक्षणासाठी निवडणूक आयोगाने ‘गेट! सेट! व्होट!’ नावाचा व्हिडिओ गेम विकसित केला आहे
नवी दिल्ली : मतदार जागृती आणि शिक्षणासाठी निवडणूक आयोगाने ‘गेट! सेट! व्होट!’ नावाचा व्हिडिओ गेम विकसित केला आहे. मतदार जागृतीसाठी आयोगाकडून नानाविध प्रकारचे मनोरंजनातून शिक्षण देणारे साहित्य तयार केले जाते व त्याचाच एक भाग म्हणून असा व्हिडिओ गेम प्रथमच तयार करण्यात आला आहे.
मनोरंजनात्मक व इंटरअॅक्टिव्ह पद्धतीने तयार केलेला हा व्हिडिओ गेम कोड्याच्या स्वरूपात १० टप्प्यांमध्ये पुढे जाणारा असून त्यातून नागरिकांना लोकशाही व निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती दिली जाते. तुम्ही जसजसे खेळत पुढच्या टप्प्याला जाल तस तशी भारतीय लोकशाही, मतदार नोंदणी, नीतीमान मतदान कसे करावे, निवडणूक आयोगाकडून काय मदत मिळू शकते याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला मिळत जाते. याखेरीज ‘प्राऊड टु बी ए व्होटर’ आणि ‘गर्व से बने मतदाता’ ही सचित्र पुस्तके, ‘वाह इलेक्शन वाह’ ही कार्टून स्ट्रिप, ‘रेडी! स्टेडी! व्होट’ हा बोर्डगेम आणि ‘लोकतंत्र एक्स्प्रेस’ हा रेडियो कार्यक्रमही आयोगाने मतदारांना मनोरंजनातून सुजाण करण्यासाठी तयार केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)