गोरक्षकांच्या दहशतीमुळे मुस्लिमांना जगण्याची भीती वाटतेय; असदुद्दीन ओवेसी भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 10:42 AM2020-08-07T10:42:25+5:302020-08-07T10:43:31+5:30
5 ऑगस्टला झालेल्या राम मंदिर भूमिपुजनावरूनही ओवेसी यांनी टीका केली होती.
लोकसभा खासदार आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( एआयएमआयएम) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी गोरक्षकांकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. गोरक्षकांच्या दहशतीमुळे मुस्लिमांना जगण्याची भीती वाटतेय, असे ओवेसी यांनी ट्विट करून म्हटले आहे. केंद्र सरकारमधील मंत्री अशा हल्लेखोरांच्या गळ्यात माळा घालत आहेत, असेही ओवेसी म्हणाले. काही दिवसांपूर्वी हरयाणा येथील गुरुग्राम येथे गोरक्षकांनी मांस घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली होती आणि त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.
ओवेसी यांनी ट्विट केलं की,गोरक्षकांमुळे मुस्लिमांचं जगणं मुश्कील केलं आहे. त्यांना जगण्याची भीती वाटत आहे. या गटावर त्वरित कारवाई करून त्यांना शिक्षा द्यायला हवी. पण, केंद्र सरकारचे काही मंत्री या गोरक्षकांच्या गळ्यात माळा घालत आहेत आणि काहींच्या कारवाईत गडबड करून त्यांना मुक्त केले जात आहे. त्यामुळेच त्यांची हिम्मत वाढली आहे.''
Gau rakshak terror is forcing Muslims to live fearing for their lives. These mobs should have been tried & punished immediately. Instead, some of them were garlanded by @PMOIndia's minister & others saw botched prosecutions resulting in acquittals. Obviously they feel emboldened https://t.co/csyhIPsE8n
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) August 6, 2020
5 ऑगस्टला झालेल्या राम मंदिर भूमिपुजनावरूनही ओवेसी यांनी टीका केली. ओवेसींनी बाबरी मशिदीसंदर्भात एक ट्विट केले आहे. बाबरी मशीद ही तेव्हाही होती, आजही आहे आणि पुढेही राहील. बाबरी जिंदा है, असे ओवेसींनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ओवेसींनी राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी उपस्थित राहणे हे त्यांनी घेतलेल्या शपथेच्याविरोधात असल्याचे म्हटले होते.
असुदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भूमीपूजन समारंभात सहभागी होणे हे पंतप्रधानपदाच्या संवैधानिक शपथेचं उल्लंघन असल्याचे काही दिवसांपूर्वी म्हटले होते. धर्मनिरपेक्षता हाच भारतीय संविधानाचा पाया आहे, असेही ओवेसी त्यावेळी म्हणाले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान म्हणून अयोध्येतील सोहळ्याला जात आहेत, की वैयक्तिक हे त्यांनी स्पष्ट करावं, असा प्रश्नार्थक रोखही औवेसी यांनी बोलून दाखवला होता.