गौरी लंकेश हत्या प्रकरणात एसआयटीला मोठं यश; मुख्य आरोपी ऋषिकेशला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 07:06 AM2020-01-10T07:06:45+5:302020-01-10T07:27:46+5:30

कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीची मोठी कारवाई; झारखंडमधून मुख्य आरोपीला बेड्या

Gauri Lankesh murder case sit arrest Key suspect from Jharkhand | गौरी लंकेश हत्या प्रकरणात एसआयटीला मोठं यश; मुख्य आरोपी ऋषिकेशला अटक

गौरी लंकेश हत्या प्रकरणात एसआयटीला मोठं यश; मुख्य आरोपी ऋषिकेशला अटक

Next

धनबाद: ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी ऋषिकेश देवडीकरला अटक करण्यात आली आहे. झारखंडच्या धनबादमधून ऋषिकेशला कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकानं अटक केली. पोलिसांना ऋषिकेशच्या घरात सनातन धर्माशी संबंधित काही पुस्तकं आढळून आली आहेत. ऋषिकेश गेल्या सहा महिन्यांपासून धनबादमधल्या कतरासमधील एका पेट्रोल पंपवर ओळख बदलून राहत होता. ५ सप्टेंबर २०१७ रोजी बंगळुरूमध्ये गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती. 

कर्नाटक पोलिसांचं विशेष तपास पथक गुरुवारी कतरासला पोहोचलं. त्यांनी कतरासमधल्या भगत परिसरात छापे टाकले. या कारवाईदरम्यान राजेश उर्फ ऋषिकेश देवडीकरला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्या घराची झडती घेण्यात आली. त्यावेळी पोलिसांना सनातन धर्माशी संबंधित अनेक पुस्तकं सापडली. ऋषिकेश गेल्या सहा महिन्यांपासून खेमका पेट्रोल पंपवर काम करत होता. याच पेट्रोल पंपच्या मालकाच्या घरात तो भाड्यानं राहत होता. 

चार जणांच्या हत्या प्रकरणात पोलीस ऋषिकेशला शोधत होते, अशी माहिती विशेष तपास पथकाचे नेतृत्त्व करणारे निरीक्षक पुनीत यांनी दिली. 'गेल्या दीड वर्षांपासून ऋषिकेशचा शोध सुरू होता. पोलिसांच्या कारवाईपासून स्वत:ला वाचवण्यासाठी तो झारखंडला पळून गेला होता,' असं पुनीत यांनी सांगितलं. सामाजिक संस्थेशी संबंधित चार जणांच्या हत्या प्रकरणातदेखील ऋषिकेशचा सहभाग आहे. या प्रकरणात १२ पेक्षा अधिक जणांना आधीच अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली. ऋषिकेश मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो वारंवार स्वत:चं नाव बदलायचा. 

ऋषिकेश गेल्या सहा महिन्यांपासून प्रदीप खेमका यांच्या पेट्रोल पंपवर नोकरी करत होता. आपण बेरोजगार आणि साधक असल्याचं त्यानं नोकरी मागताना सांगितलं होतं, अशी माहिती खेमका यांनी पोलिसांना दिली. पेट्रोल पंपवर नोकरी करताना त्यानं स्वत:बद्दल कोणालाही फारशी माहिती दिली नाही. त्यामुळे कोणालाही त्याच्याबद्दल संशय वाटला नाही. खेमका यांनी या प्रकरणात संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन पोलिसांना दिलं आहे. सध्या पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. 

Web Title: Gauri Lankesh murder case sit arrest Key suspect from Jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.