गौरी लंकेश हत्या: हा माझा भारत नाही; ए. आर. रेहमानची उद्विग्न प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 10:51 AM2017-09-10T10:51:15+5:302017-09-10T12:37:15+5:30
ऑस्कर पुरस्कार विजेते प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांनी बंगळुरूत झालेल्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर दुःख व्यक्त करत हा माझा भारत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
मुंबई, दि. 10 - ऑस्कर पुरस्कार विजेते प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांनी बंगळुरूत झालेल्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर दुःख व्यक्त करत हा माझा भारत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. गौरी लंकेशच्या हत्येसारख्या घटना घडत राहिल्या तर तर हा माझा भारत नाही अशी उद्विग्न प्रतिक्रिया रेहमान यांनी दिली. गुरूवारी मुंबईमध्ये आपली आगामी फिल्म 'वन हार्ट : द ए आर रेहमान कन्सर्ट फिल्म' च्या प्रीमिअरवेळी रेहमान बोलत होते.
बंगळुरूमध्ये गौरी लंकेश यांच्या हत्येबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रेहमान म्हणाले, मी हे ऐकून खूप दुखी झालो, मी आशा करतो की भारतात अशा गोष्टी होणार नाही. जर भारतात अशा गोष्टी होती तर तो माझा भारत नाही. मला वाटते की माझा भारत प्रगतीशील आणि विनम्र असायला हवा.
रेहमान हे ‘वन हार्टः द ए. आर. रेहमान कन्सर्ट फिल्म’ या आगामी चित्रपटाबद्दल ते एका कार्यक्रमात सहभागी झाले होते.'वन हार्ट : द एआर रेहमान कन्सर्ट फिल्म' हा चित्रपट उत्तर अमेरिकेतील 14 शहरांमध्ये होणाऱ्या कन्सर्टवर आधारीत आहे. यात रेहमान आणि त्यांच्या बँडच्या कलाकारांच्या मुलाखती आहे. तसेच त्यांचा सरावांचा समावेश आहे. तसेच यात रेहमान यांची खासगी माहिती मिळणार आहे.
पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची हत्या ५ सप्टेंबरच्या रात्री करण्यात आली.बंगळुरूमध्ये असलेल्या गांधीनगर भागात गौरी लंकेश यांचे घर आहे याच ठिकाणी ५ सप्टेंबरला आपल्या घरासमोर कारमधून उतर असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्यांना ठार करण्यात आले. या धक्कादायक घटनेला पाच दिवस उलटूनही गौरी लंकेश यांचे मारेकरी मोकाटच आहेत.गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांबाबत माहिती किंवा पुरावे सादर करणाऱ्याला १० लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. तरीही या प्रकरणी पोलिसांना कोणतेही धागेदोरे अद्याप हाती लागलेले नाहीत.