गौरी लंकेश, दाभोलकर, कलबुर्गी, पानसरेंच्या हत्येसाठी दोन पिस्तुलांचा वापर; मात्र मारेकरी वेगळे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 07:34 AM2018-06-22T07:34:23+5:302018-06-22T07:34:23+5:30

कर्नाटक एसआयटीच्या तपासातून महत्त्वपूर्ण माहिती समोर

Gauri Lankesh narendra Dabholkar m Kalburgi govind Pansare killings Two guns but different shooters used say cops | गौरी लंकेश, दाभोलकर, कलबुर्गी, पानसरेंच्या हत्येसाठी दोन पिस्तुलांचा वापर; मात्र मारेकरी वेगळे

गौरी लंकेश, दाभोलकर, कलबुर्गी, पानसरेंच्या हत्येसाठी दोन पिस्तुलांचा वापर; मात्र मारेकरी वेगळे

Next

बंगळुरु: गौरी लंकेश, नरेंद्र दाभोळकर, एम. कलबुर्गी, गोविंद पानसरे यांच्या हत्येसाठी दोन पिस्तुलं वापरण्यात आली. मात्र त्यांच्या हत्या करणाऱ्या व्यक्ती वेगवेगळ्या होत्या, अशी माहिती कर्नाटक पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी वापरलेलं पिस्तुल कलबुर्गी आणि पानसरे यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलं. मात्र हे हल्ले करणाऱ्या व्यक्ती वेगवेगळ्या होत्या, अशी माहिती एसआयटीला मिळाली आहे. 

गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात कर्नाटक पोलिसांनी 11 जूनला परशुराम वाघमारेला अटक केली. परशुरामला उत्तर कर्नाटकमधील विजयपुरा येथील सिंधगीतून अटक करण्यात आली. गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या चारजणांनी दिलेल्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली. हे चारजण सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंधित आहेत. चौकशीदरम्यान परशुराम वाघमारेनं लंकेश यांच्या हत्येची कबुली दिली. लंकेश यांची हत्या करण्यासाठी काहीजणांनी आपल्याला पिस्तुल वापरण्याचं प्रशिक्षण दिल्याचं वाघमारेनं पोलिसांना सांगितलं. ज्या ठिकाणी त्याला पिस्तुल चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं, ते ठिकाणही त्यानं गुरुवारी पोलिसांना दाखवलं. हिंदू जनजागृती समितीचा माजी संयोजक अमोल काळेनं पिस्तुल चालवण्याचं प्रशिक्षण दिल्याची माहितीदेखील त्यानं पोलिसांना दिली.  

गौरी लंकेश, नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे आणि एम. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी दोन 7.65 मीमीची दोन पिस्तुलं वापरण्यात आल्याचं एसआयटीच्या तपासातून समोर आलं आहे. मात्र या हत्या वेगवेगळ्या व्यक्तींनी केल्या आहेत. या हत्यांमागे हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. 'चार हत्यांसाठी वापरण्यात आलेली पिस्तुलं सारखी आहेत. मात्र या हत्या वेगवेगळ्या व्यक्तींनी केल्या आहेत. या हत्यांचा कट रचण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी दोन किंवा तीन व्यक्तींवर होती,' अशी माहिती कर्नाटक पोलीस दलातील सूत्रांनी दिली.
 

Web Title: Gauri Lankesh narendra Dabholkar m Kalburgi govind Pansare killings Two guns but different shooters used say cops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.