गौरी लंकेश यांच्या मारेक-यांची ओळख पटली! कर्नाटक सरकारने केला गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 01:04 PM2017-10-03T13:04:36+5:302017-10-03T13:59:54+5:30
प्रसिद्ध पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात कर्नाटक सरकारने महत्वपूर्ण खुलासा केला आहे. गौरी लंकेश यांच्या मारेक-यांची ओळख पटली आहे.
बंगळुरु - प्रसिद्ध पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात कर्नाटक सरकारने महत्वपूर्ण खुलासा केला आहे. गौरी लंकेश यांच्या मारेक-यांची ओळख पटली असून त्यांच्याविरोधात सबळ पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे असे कर्नाटक सरकारकडून सांगण्यात आले आहे. गौरी लंकेश यांचे मारेकरी कोण आहेत ते आम्हाला माहिती आहे असे कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी एनडीटीव्ही वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
मारेक-यांची ओळख पटली ऐवढेच त्यांनी सांगितले. ते कोण आहेत, तपास कुठल्यादिशेने सुरु आहे याची सविस्तर माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. अधिक माहिती उघड केल्यास तपासात अडथळे निर्माण होतील असे रामलिंगा रेड्डी यांनी सांगितले. 5 सप्टेंबरच्या रात्री गौरी लंकेश (55) यांची बंगळुरुतील त्यांच्या राहत्या घराजवळ गोळया झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. चेहरा लपवण्यासाठी मारेक-यांनी डोक्यात हेल्मेट घातले होते. मारेक-यांनी गौरी लंकेश यांच्या छातीत गोळया मारल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.
'गौरी लंकेश गेट उघडून घराच्या दिशेने जात असताना हल्लेखोराने त्यांना आवाज दिला. यानंतर गौरी लंकेश हल्लेखोराच्या दिशेने चालत गेल्या. गौरी लंकेश जवळ येताच हल्लेखोराने गोळ्या झाडण्यास सुरुवात केली', अशी माहिती सुत्रांनी दिली. ‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या संपादिका होत्या. कर्नाटकातील सांप्रदायिकता आणि उजव्या विचारसरणीविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. गौरी लंकेश या दिवंगत साहित्यिक पी लंकेश यांच्या कन्या होत्या.
गौरी लंकेश आणि कर्नाटकातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत एम एम कलबुर्गी यांच्या हत्येमध्ये अजून एक समान धागा असल्याचंही फॉरेन्सिकच्या अहवालात निष्पन्न झालं आहे. गौरी लंकेश आणि एम एम कलबुर्गी यांच्या हत्येत वापरण्यात आलेलं पिस्तूल एकाच बनावटीचं असल्याचं फॉरेन्सिकच्या प्राथमिक चाचणीत समोर आलं आहे. दोघांच्या हत्येसाठी 7.65 मिमी देशी बनावटीचं पिस्तूल वापरण्यात आलं होतं.
फॉरेन्सिकने गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर घटनास्थळावरुन बुलेट्स आणि काडतुसं ताब्यात घेतली होती. विशेष तपास पथक एसआयटीमार्फत गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. त्यांच्या हत्येनंतर समाजातून तीव्र संताप व्यक्त झाला होता. अनेक विचारवंतांनी आपली नाराजी प्रगट केली होती.