गरिबांना 365 दिवस मोफत जेवण मिळावं यासाठी गौतम गंभीरचा पुढाकार

By Shivraj.yadav | Published: August 2, 2017 04:24 PM2017-08-02T16:24:31+5:302017-08-02T16:36:22+5:30

गौतम गंभीरने दिल्लीमधील पटेल नगर येथे गरिबांना मोफत जेवण मिळावं यासाठी आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून कॅम्पेन सुरु केलं आहे

Gautam Gambhir has launched a campaign to feed the poor and hungry free of cost | गरिबांना 365 दिवस मोफत जेवण मिळावं यासाठी गौतम गंभीरचा पुढाकार

गरिबांना 365 दिवस मोफत जेवण मिळावं यासाठी गौतम गंभीरचा पुढाकार

googlenewsNext
ठळक मुद्देएकाही गरिबाला भुकेल्या पोटी झोपावं लागू नये यासाठी गौतम गंभीरने हे पाऊल उचललं आहेशाहरुख खानने गौतम गंभीरने उचललेल्या या पावलाचं कौतुक केलं आहे

नवी दिल्ली, दि. 2 - मैदानावर आपल्या सडेतोड स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असणारा भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू गौतम गंभीर मैदानाबाहेरही तुफान फटकेबाजी करताना दिसत आहे. मात्र ही फटकेबाजी कोणत्याही खेळात नसून सामाजिक कार्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. गौतम गंभीरला असलेली सामाजिक कार्याची आवड वेळोवेळी त्याच्या कामातून दिसली आहे. फक्त सामाजिक कार्यच नाही तर देशभक्तीचा प्रश्न आला तरीही गंभीर सर्वात पुढे असतो. मात्र सध्या तो चर्चेत येण्याचं कारण म्हणजे गरिबांना मोफत जेवण मिळावं यासाठी त्याने घेतलेला पुढाकार. 

गौतम गंभीरने दिल्लीमधील पटेल नगर येथे गरिबांना मोफत जेवण मिळावं यासाठी आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून कॅम्पेन सुरु केलं आहे. एकाही गरिबाला भुकेल्या पोटी झोपावं लागू नये यासाठी गौतम गंभीरने हे पाऊल उचललं आहे. गौतम गंभीरने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या या कार्याची माहिती दिली आहे. '365 दिवस, 52 आठवडे, 12 महिने, असंख्य उपासमार आणि एक आशा', असं गौतम गंभीरने या ट्विटमध्ये सांगितलं आहे. गौतम गंभीरने ट्विटमध्ये #communitykitchen1 #ggf असं हॅशटॅगही केलं आहे. 


गौतम गंभीरने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने लिहिलं आहे की, 'आतापर्यंत वर्ल्ड कप जिंकलो, आयपीएल जिंकलो, अनेक विरोधकांना हरवलं. आता भूकमारीचा पराभव करुन ह्रदय जिंकण्याची वेळ आहे'. 


गौतम गंभीरच्या या सामाजिक कार्याचं अनेकांनी कौतुक केलं असून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. फक्त सामान्यच नाही तर बॉलिवूड बादशहा शाहरुख खाननेदेखील आपल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या कर्णधाराने उचलेलं हे पाऊल कौतुकास्पद असल्याचं सांगितलं आहे. इतकंच नाही तर या सामाजिक कार्यात सहभागी होण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. शाहरुखने ट्विट करत गौतम गंभीरला विचारलं आहे की, 'मी कशाप्रकारे मदत करु शकतो मला नक्की सांग. शुभेच्छा'.


गंभीरने शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचं नेतृत्व करत असताना दोनवेळा आयपीएल जिंकला आहे. गौतम गंभीरने फक्त पुढाकार घेतला नसून त्याने सहभागदेखील घेतला असून आपल्या हाताने गरिबांना जेवण वाढलं आहे. 


गौतम गंभीरने सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या 25 सीआरपीएफ जवानांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी गौतम गंभीरने घेतली आहे. 

Web Title: Gautam Gambhir has launched a campaign to feed the poor and hungry free of cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.