गौतम गंभीर करणार भाजपासाठी 'बॅटिंग', दिल्लीतून निवडणूक लढवण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 01:40 PM2018-08-20T13:40:41+5:302018-08-20T13:50:11+5:30

पुढच्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाला आव्हान देण्यासाठी भारतीय जनता पक्षाला तगडा फलंदाज भेटण्याची शक्यता आहे.

Gautam Gambhir will join BJP? contest elections from Delhi | गौतम गंभीर करणार भाजपासाठी 'बॅटिंग', दिल्लीतून निवडणूक लढवण्याची शक्यता

गौतम गंभीर करणार भाजपासाठी 'बॅटिंग', दिल्लीतून निवडणूक लढवण्याची शक्यता

Next

नवी दिल्ली -  पुढच्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाला आव्हान देण्यासाठी भारतीय जनता पक्षाला तगडा फलंदाज भेटण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या टी-20 आणि  एकदिवसीय विश्वचषक विजयांमध्ये मोलाचा वाटा उचलणारा गौतम गंभीर लवकरच भाजपात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच भाजपाकडून तो दिल्लीतून लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. 

डावखुरा फलंदाज गौतम गंभीर याने 2007 च्या टी-20 विश्वचषक आणि 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम लढतीत दमदार फलंदाजी करून भारतीय संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले होते. तसेच गंभीरने 58 कसोटी, 147 एकदिवसीय आणि 37 टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये 9 शतके आणि चार हजार धावा आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11 शतके आणि पाच हजार धावा त्याच्या नावावर आहेत.

दीर्घकाळापासून भारतीय संघाबाहेर असलेला गौतम गंभीर गेल्या काही काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. मात्र सध्या तो ट्विटरवरून विविध मुद्द्यांवर आपले मत मांडत असतो. तसेच त्याने मोदी सरकारच्या अनेक निर्णयांना ट्विटरवरून जाहीर पाठिंबाही दिला होता. 

दरम्यान, आम आदमी पक्षाशी दोन हात करण्यासाठी दिल्लीमधील आपली स्थिती भक्कम करण्यावर भाजपाने आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी  भाजपा लोकप्रिय आणि विश्वसनीय चेहऱ्याच्या शोधात आहे. त्यामुळे पुढील काळात भाजपाकडून गंभीरला पक्षप्रवेशासाठी पायघड्या घातल्या जाण्याची शक्यता आहे.  

Web Title: Gautam Gambhir will join BJP? contest elections from Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.