दिल्ली हत्याकांडावर गौतम गंभीरचा संताप, जनावर म्हणत व्यक्त केला राग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 04:09 PM2023-05-29T16:09:11+5:302023-05-29T16:09:32+5:30
दिल्लीच्या बाहेरील उत्तरेला शाहबाद डेअरी पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली.
नवी दिल्ली - अल्पवयीन मुलीच्या हत्येचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. शाहबाद डेअरी परिसरात साहिल नावाच्या व्यक्तीने 16 वर्षीय मुलीची चाकूने वार करत आणि दगडाने ठेचून हत्या केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले की, वाद सुरू असताना त्याने तरुणीला रस्त्यात थांबवले आणि तिच्यावर चाकूने हल्ला केला. मुलीवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ इतका भयानक आहे की तो दाखवताही येऊ शकत नाही. दरम्यान, मुलीचा मारेकरी साहिल याला बुलंदशहर येथून अटक करण्यात आली आहे. या घटनेवरुन आता सोशल मीडियात संताप व्यक्त होत आहे. माजी क्रिकेटर आणि भाजप खासदार गौतम गंभीरनेही राग व्यक्त केला आहे.
दिल्लीच्या बाहेरील उत्तरेला शाहबाद डेअरी पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. एकाने पोलिसांना फोन करून मुलीवर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली आणि तातडीने घटनास्थळी येण्यास सांगितले. पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाची चौकशी केली. ही अल्पवयीन मुलगी रस्त्यावरून जात असताना अचानक एका मुलाने तिला अडवून तिच्यावर चाकूने हल्ला केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याने मुलीला दगडाने ठेचून ठार केले. विशेष म्हणजे ही घटना घडत असताना, बाजुला काही व्यक्ती उभ्या असलेल्या, तेथून जात असलेल्या दिसून येतात. मात्र, कुणीही त्या आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. यावरुन, आता गौतम गंभीरने ट्विट करुन संताप व्यक्त केला आहे.
जर तुमच्या बहिण किंवा मुलीवर असा वैश्यी हल्ला झाला असता तरी हे लोकं असेच चालत, बघत पुढे गेले असते का, जनावर फक्त तोच नाही, तर सगळेच आहेत, असे म्हणत गंभीरने दिल्लीतील घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
अगर अपनी बहन या बेटी पर ऐसा वहशी हमला होता तो भी क्या ये लोग ऐसे ही चलते चले जाते. जानवर सिर्फ़ वो नहीं, सब हैं #HeWillSuffer
— Gautam Gambhir (@GautamGambhir) May 29, 2023
दरम्यान, गौतम गंभीरच्या ट्विटवर अनेकांनी गौतम गंभीरला ट्रोल केलंय. दिल्लीत पैलवानांच्या आंदोलनावर व्यक्त झाल्याबद्दल आभार, मोदी सरकारला थेट सुनावल्याबद्दल गंभीरचं कौतुक केलंय. तर, काहींनी आंदोलकांना झालेल्या मारहाणीवर अद्याप का व्यक्त झाला नाही, असे म्हणत ट्रोल केलंय. दरम्यान, गंभीरने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट उल्लेख कोणाचाच केला नाही, पण #Hewillsuffer हा हॅशटॅग वापरला आहे.
हल्ल्याचे कारण काय?
पोलीस तपासात आरोपीचे नाव साहिल असून वडीलांचे नाव सर्फराज असल्याचे समोर आले. अल्पवयीन मुलगीही दिल्लीची रहिवासी होती. साहिल आणि ती मुलगी रिलेशनशिपमध्ये असल्याचे पोलिसांनी, मिळालेल्या माहितीनुसार सांगितले. प्रेम संबंधातील मतभेदामुळे रविवारी त्यांच्यात वाद झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानंतर अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसाला जात असताना साहिलने तिला रस्त्यातच अडवले. दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने साहिलने मुलीवर चाकूने हल्ला केला.
आरोपी साहिल तरुणीवर चाकूने वार करत असल्याचे फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यावेळी लोक रस्त्यावरून ये-जा करताना दिसत होते. पण कोणीही हस्तक्षेप करायला तयार नव्हते. सतत चाकूने हल्ला करून साहिल घटनास्थळावरून फरार झाला. दुसरीकडे, जखमी मुलीला घटनास्थळावरून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या वडिलांनी या संबंधी शाहबाद डेअरी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. सध्या आरोपी साहिल फरार असून त्याच्या शोध सुरू आहे.