गावस्करांनी बीसीसीआयकडून मागितले १.९० कोटींचे मानधन
By admin | Published: April 27, 2015 04:28 PM2015-04-27T16:28:42+5:302015-04-27T18:50:05+5:30
गेल्या वर्षी युएई व भारतात झालेल्या आयपीएलच्या सातव्या पर्वादरम्यान बीसीसीआय-आयपीएलचे अध्यक्षपद भूषवल्याबद्दल भारताचे माजी कप्तान सुनील गावस्कर यांनी बीसीसीआयकडून १.९० कोटी रुपयांची मागणी केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - गेल्या वर्षी युएई व भारतात झालेल्या आयपीएलच्या सातव्या पर्वादरम्यान बीसीसीआय-आयपीएलचे अध्यक्षपद भूषवल्याबद्दल भारताचे माजी कप्तान सुनील गावस्कर यांनी बीसीसीआयकडून १.९० कोटी रुपयांची मागणी केली आहे. गावस्कर यांची आयपीएलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला दिले होते. या काळात त्यांना त्यांच्या मीडिया कमिटमेंट्स ( समालोचन व लिखाण) पाळता येणार नसल्यामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी बीसीसायने त्यांना योग्य मानधन द्यावे असे निर्देशही न्यायालयाने दिले होते.
त्याच पार्श्वभूमीवर गावस्कर यांनी बीसीसआय बोर्डाला पत्र लिहून १ कोटी ९० लाख रुपयांची मागणी केली आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिली आहे. ' बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवताना आपण टीव्हीवरील समालोचन, लिखाण आणि माध्यम पंडीत म्हणून काम करू शकलो नाही. त्यामुळे या कामाच्या माध्यमातून मिळणा-या पैशांपासून आपण वंचित राहिलो असून माझे झालेले नुकसान आपण मानधनाच्या स्वरूपात भरून काढण्यासाठी मला १ कोटी ९० लाख रुपये द्यावे,' असे गावस्कर यांनी पत्रात नमूद केल्याचे त्या अधिका-याने सांगितले.
दरम्यान गावस्करांची ही मागणी अद्याप मंजूर करण्यात आली नसली तरी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार आम्हाला त्यांना मानधन द्यावे लागणार आहे, असे तो अधिकारी म्हणाला. फायनान्स कमिटीसमोर हे पत्र ठेवण्यात येणार असून त्यांच्याद्वारेच गावस्कर यांना देण्यात येणारी रक्कम मंजूर करण्यात येईल. मात्र ती रक्कम गावस्कर यांनी मागितलेल्या रक्कमेइतकीच असेल की त्यापेक्षा कमी हे कमिटीच्या शिफारशीनंतरच ठरेल, असेही त्या अधिका-याने सांगितले.