नोटाबंदीनंतरही विकासाचा वेग कायम, जीडीपीत 7 टक्क्यांनी वाढ
By admin | Published: February 28, 2017 08:36 PM2017-02-28T20:36:26+5:302017-02-28T20:36:26+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या रोखटंचाईमुळे देशाच्या आर्थिक विकासावर विपरित
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या रोखटंचाईमुळे देशाच्या आर्थिक विकासावर विपरित परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र नोटाबंदीदरम्यानच्या तिमाहीतही देशाच्या विकासाचा दर कायम राहिल्याचे समोर आले आहे. आज जाहीर झालेल्या ऑक्टोबर ते डिसेंबर या चालू वित्तिय वर्षातील तिसऱ्या तिमाहीत देशाच्या जीडीपीत 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आज जाहीर झालेल्या तिसऱ्या तिमाहीतील आर्थिक आकडेवारीनुसार जीडीपीमध्ये सात टक्के दराने वाढ झाली आहे. या याळात उत्पादन क्षेत्रात 8.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नोटाबंदीनंतर विविध आर्थिक संशोधन संस्था आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी या वित्तीय वर्षात देशाचा आर्थिक विकास दर 7.1 टक्क्याहून कमी राहील, अशी भीती व्यक्त केली होती. मात्र सीएसओने सहा जानेवारीला प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत जीडीपीच्या विकासदराची आकडेवारी 7.1 टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज वर्तवला होता.
रिझर्व्ह बँकेने या महिन्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध केलेल्या मौद्रिक समीक्षेमध्ये चालू आर्थिक वर्षासाठी देशाचा आर्थिक विकास दर घटवून 6.9 टक्के एवढा ठेवला होता. मात्र पुढील आर्थिव वर्षासाठी विकास दरात 7.4 टक्के वाढीचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेसुद्धा आपल्या अहवालात भारताच्या आर्थिक वृद्धीच्या दरात घट करून ती 6.6 टक्क्यांवर ठेवली होती.
#FLASH GDP growth was at 7% in the #DeMonetisation period (Oct-Dec) pic.twitter.com/a7c8kQWd3C
— ANI (@ANI_news) February 28, 2017