सोहराबुद्दीन प्रकरणी आरोप करण्यात आलेल्या गीता जोहरी गुजरातच्या नव्या डीजीपी
By Admin | Published: April 4, 2017 04:28 PM2017-04-04T16:28:31+5:302017-04-04T16:29:00+5:30
गुजरातच्या पहिल्या आयपीएस अधिकारी गीता जोहरी यांची गुजरातच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 4 - गुजरातच्या पहिल्या आयपीएस अधिकारी गीता जोहरी यांची गुजरातच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इशरत जहाँ चकमक प्रकरणी आरोपी असलेले आणि सध्या जामिनावर बाहेर असणारे पी पांडे यांनी राजीनामा दिल्यानंतर गीता जोहरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गीता जोहरी 1982 बॅचमधील आयपीएस अधिकारी आहेत. पांडे यांच्या राजीनाम्यानंतर गीता जोहरींचं नाव आघाडीवर होतं.
गीती जोहरी यांच्याव्यतिरिक्त एडीजीपी शिवानंद झा और एडीजीपी तिर्थराज (कायदा आणि सुव्यवस्था) यांची नावेही शर्यतीत होती. शिवानंद झा 1983 तर तिर्थराज 1984 मधील बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यादृष्टीने पाहायचं गेल्यास दोघंही गीता जोहरींना ज्युनिअर आहेत. गीता जोहरी सध्या गुजरात पोलीस हाऊसिंग बोर्डाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी असून नोव्हेंबर महिन्यात निवृत्त होत आहेत.
गीता जोहरींवर सोहराबुद्दीन शेख चकमकीप्रकरणी ठपका ठेवण्यात आला होता. मात्र नंतर त्यांच्यावरील सर्व आरोप हटवण्यात आले होते. गुजरातमधील बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख व त्याची पत्नी कौसरबी तसंच 2006 मधील तुलसी राम प्रजापती एनकाऊंटर तपास प्रकरणी त्यांची भूमिका वादात राहिली होती.
गीता जोहरी 1990 रोजी चर्चेत आल्या होत्या जेव्हा गुजरातमधील अंडरवर्ल्ड किंग अब्दुल लतिफच्या दरियापूर जिल्ह्यातील घरावर धाड टाकली होती. यावेळी त्याचा शूटर शरीफ खानला त्यांनी अटक केली होती. मात्र यावेळी अब्दुल लतीफ पळून जाण्यात यशस्वी झाला होता. 16 एप्रिल 2015 रोजी पहिल्यांदा गीता जोहरी यांना गुजरातच्या पोलीस महासंचालक बनवण्यात आलं होतं.
महत्वाचं म्हणजे इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणात आरोपी असलेले गुजरातचे पोलीस महासंचालक पी. पी. पांडे यांनी दिलेला राजीनामा स्वीकारण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी गुजरात सरकारला परवानगी दिली. जामिनावर असलेले पांडे नीयत वयोमानानुसार निवृत्त झाल्यानंतर गुजरात सरकारने त्यांना ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली होती. या मुदतवाढीस ज्युलिओ रिबेरो यांनी आव्हान दिल्यानंतर पांडे यांनी राजीनाम्याचे पत्र राज्य सरकारला पाठविले होते. सरन्यायाधीश न्या. जे. एस. केहर व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने म्हटले की, पांडे यांनी राजीनामा दिला असल्याने गुजरात सरकार त्यांची मुदतवाढ रद्द करून तो राजीनामा स्वीकारू शकते.
१५ जून २००४ रोजी अहमदाबाद शहराबाहेर गुजरात पोलिसांनी केलेल्या बनावट चकमकीत मुंब्रा येथील इशरत जहाँ,जावेद शेख ऊर्फ प्रणेश पिल्लई, अकबरअली अमजदअली राणा आणि झाशान जोहर असे चारजण ठार झाले होते. त्यावेळचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा या चौघांनी कट रचला होता, असा पोलिसांचा दावा होता. त्यावेळी पांडे गुजरात पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख होते.