भारतात परतली गीता; पालकांना ओळखण्यास नकार

By admin | Published: October 26, 2015 11:40 PM2015-10-26T23:40:07+5:302015-10-27T02:41:47+5:30

सुमारे १५ वर्षांपूर्वी चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचलेली मूकबधिर गीता अखेर सोमवारी भारतात परतली. नवी दिल्लीच्या विमानतळावर दाखल होताच तिचे जोरदार स्वागत करण्यात आले

Geeta returned to India; Rejecting parents | भारतात परतली गीता; पालकांना ओळखण्यास नकार

भारतात परतली गीता; पालकांना ओळखण्यास नकार

Next

नवी दिल्ली : सुमारे १५ वर्षांपूर्वी चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचलेली मूकबधिर गीता अखेर सोमवारी भारतात परतली. नवी दिल्लीच्या विमानतळावर दाखल होताच तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. अर्थात गीताचे आई-वडील असण्याचा दावा करणारे जनार्दन महतो व शांती देवी यांना ओळखण्यास खुद्द गीताने नकार दिला. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष गीता व महतो कुटुंबीयांच्या डीएनए चाचणीच्या अहवालाकडे लागले आहे. डीएनए अहवालानंतरच गीता जनार्दन महतो यांची मुलगी आहे वा नाही, हे स्पष्ट होणार आहे. डीएनए चाचणीसाठी गीताच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून ते हैदराबादस्थित सेंटर फॉर फॉरेन्सिक सायन्स लेबोरटरीकडे पाठवण्यात आले आहेत. दोन दिवसात या चाचणीचा अहवाल येणे अपेक्षित आहे. तोपर्यंत गीता इंदूरच्या एका नामांकित मूकबधिर संस्थेत राहणार आहे.
पांढऱ्या-लाल रंगाचा सलवार सूट आणि डोक्यावर ओढणी अशा पोशाखात २३ वर्षांची गीता पावणे अकराच्या सुमारास येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. गेल्या अनेक वर्षांपासून गीताचा सांभाळ करणाऱ्या एधी या समाजसेवी संस्थेचे पाच सदस्यही तिच्यासोबत आले आहेत. हे सर्वजण भारत सरकारचे विशेष अतिथी असणार आहेत. विमानतळावर परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी आणि पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी गीताचे जोरदार स्वागत केले. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी गीताच्या भारत वापसीवर आनंद व्यक्त केला. गीता, घरी परतल्याबद्दल तुझे स्वागत मुली, असे टिष्ट्वट त्यांनी केले.
यानंतर एका पत्रपरिषदेत बोलताना स्वराज यांनी गीताने महतो कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटल्यानंतर ओळखण्यास नकार दिल्याचे सांगितले. गीताने बिहारच्या सहरसा येथील महतो कुटुंबीयांना छायाचित्रातून ओळखले होते. हेच आपले आई-वडील असल्याचे तिने म्हटले होते. मात्र सोमवारी महतो कुटुंबाला प्रत्यक्ष भेटल्यानंतर ती महतो दाम्पत्य व तीन भावांना ओळखण्यास असमर्थ ठरली. तिने महतो कुटुंबाला आपले कुटुंब मानण्यास नकार दिला. त्यामुळे संशय दूर करण्यासाठी डीएनए चाचणी केली जाईल. गीता व तिचे माता-पिता असण्याचा दावा करणाऱ्या महतो दाम्पत्याचे डीएनए नमुने जुळले तर तिला त्यांच्या सुपूर्द करण्यात येईल. अन्यथा यादरम्यान गीताच्या माता-पित्याचा शोध सुरू राहील. तोपर्यंत गीताला इंदूरच्या मूकबधिर संस्थेत ठेवण्यात येईल, असे स्वराज यांनी सांगितले. स्वत: गीताने महतो कुटुंबीयांना छायाचित्रातून ओळखले होते. हे छायाचित्र भारतीय उच्चायुक्तालयाने इस्लामाबादला पाठवले होते. त्यानुसार गीताला तिच्या कुटुंबीयांकडे सोपवले जाणार आहे. अर्थात तत्पूर्वी गीताची डीएनए चाचणी केली जाईल. महतो कुटुंबाशिवाय पंजाब, बिहार, झारखंड व उत्तर प्रदेशच्या वेगवेगळ्या दाम्पत्यांनी गीता ही आपली मुलगी असल्याचा दावा केला होता. मात्र गीताने दिलेल्या माहितीनुसार, केवळ महतो कुटुंबीयांनी दिलेली माहिती जुळत होती. तेलंगणच्या एका कुटुंबानेही गीता ही आपली मुलगी असल्याचे म्हटले होते. मात्र गीताने त्यांचे छायाचित्र पाहून ते तिचे आईवडील असल्याचा इन्कार केला होता.
आजपासून सुमारे १५ वर्षांपूर्वी गीता जालंधरजवळच्या करतारपूर येथून बैसाखी सणासाठी गेली असता बेपत्ता झाली होती. त्यावेळी गीताचे वडील पंजाबमध्ये गवंडी म्हणून काम करत होते. पाकिस्तानी रेंजर्सला लाहोर रेल्वेस्थानकावर समझोता एक्स्प्रेसमध्ये गीता सापडली होती. एकटी व भांबावलेली गीता त्यावेळी केवळ ७ ते ८ वर्षांची होती. यानंतर एधी फाऊंडेशनचे बिलकीस एधी यांनी तिला दत्तक घेतले होते. तेव्हापासून ती त्यांच्यासोबतच कराचित राहात होती. खुद्द बिलकीस आणि त्यांचे नातवंड साद आणि सबा एधी हेही गीतासोबत भारतात आले आहेत. सलमान खान अभिनित ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच अगदी या चित्रपटाच्या कथानकाशी मिळती जुळती असलेली गीताची कर्मकहाणीही प्रकाशात आली होती. यानंतर सुषमा स्वराज यांच्या निर्देशानुसार पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त टीसीए राघवन गत आॅगस्टमध्ये गीताला भेटले होते. स्वराज यांनीच राघवन यांना गीताला भेटण्याचे व तिच्या भारतातील कुटुंबीयांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.
>>> गावकऱ्यांनी साजरा केला आनंद
पाटणा : बिहारातील कबीराधाब गावातही गीताच्या घरवापसीचा आनंद साजरा केला गेला. आपली मुलगी परतल्याच्या आनंदात संपूर्ण कबीराधाब गावात मिठाई वाटली गेली. याच गावातील जनार्दन महतो यांनी गीता ही आपली मुलगी असल्याचा दावा केला आहे.
या कुटुंबाने केलेल्या दाव्यानुसार,सुमारे १५ वर्षांपूर्वी पंजाबच्या लुधियाना शहरातील रामनगर भागात पिता जनार्दन महतो आणि आई शांतीदेवी यांच्यासोबत गीता राहायची. मात्र एकेदिवशी पंजाबच्या जालंधरमध्ये आईवडिलांसोबत ती बैसाखी मेला पाहायला गेली आणि तेथूनच बेपत्ता झाली. येथून गीता समझोता एक्स्प्रेसमध्ये बसून पाकिस्तानात पोहोचली. आईवडिलांनी गीताला बराच शोध घेतला पण ती सापडली नाही. यादरम्यान जनार्दन महतो बिहारच्या सहरसा जिल्ह्णाच्या कबीराधाब गावात स्थायिक झाले. गीता तब्बल १५ वर्षांनंतर घरी परतणार असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आहे. केवळ तेच नाही तर कबीराधाब गावातील संपूर्ण गावकरी उत्साहित आहेत. गीताचे पाच भाऊ आहेत. जे तूर्तास लुधियानात मोलमजुरी करतात. गीताची लहान बहीण सुनीताचे लग्न झाले आहे.

Web Title: Geeta returned to India; Rejecting parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.