गीता भारतात तर परतली, पण पालकांबाबत संदिग्धता कायम
By admin | Published: October 26, 2015 04:10 PM2015-10-26T16:10:13+5:302015-10-26T16:17:00+5:30
चुकून सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेली गीता १५ वर्षांनी भारतात परतली खरी, मात्र माहतो कुटुंबिय आपले खरे पालक नसल्याचे तिने सांगितल्याने तिच्या पालकांबाबत अद्याप संदिग्धता आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - चुकून सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेली गीता १५ वर्षांनी भारतात परतली खरी, मात्र माहतो कुटुंबिय आपले खरे पालक नसल्याचे तिने सांगितल्याने तिच्या पालकांबाबत अद्याप संदिग्धता आहे. मात्र असे असले तरी माहतो कुटुंबिय व गीता यांची डीएनए चाचणी करण्यात येणार असून त्यानंतर पुढील दिशा स्पष्ट होऊ शकेल, असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले.
तब्बल १५ वर्षांनी मायदेशी परतणा-या गीताचे आज सकाळी ईधी कुटुंबियांसह कराचीहून दिल्लीत आगमन झाले. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी तिच्या स्वागतासाठी उपस्थित होते. आज दुपारी तिने सुषमा स्वराज यांची भेट घेतल्यानंतर स्वराज यांनी पत्रकार परिषद घेत गीताच्या भारत आगमनाचा घटनाक्रम विशद केला.
देशातील चार राज्यातील चार कुटुंबांनी गीता आपली मुलगी असल्याचा दावा केला होता, तेव्हा आम्ही त्यांच्याकडून फोटो घेऊन ते गीतासमोर सादर केले, मात्र तिने त्यांना ओळखण्यास नकार दिला. मात्र माहतो कुटुंबाचा फोटो तिने ओळखला आणि ती भारतात आली. इतकी वर्ष गीताचा मुलीप्रमाणे सांभाळ केल्याबद्दल मी ईधी कुटुंबियांचे मनापासून आभार मानते आणि गीताला भारतात पाठवण्यासाठी त्वरित कारवाई करत, कागदपत्रांची पूर्तता केल्याबद्दल मी पाकिस्तानच्या अधिका-यांची अतिशय आभारी आहे, असे स्वराज यांनी सांगितले.
भारतात परतल्यावर गीता व माहतो कुटुंबियांची भेट झाली असली तरी ते आपले पालक नसल्याचे गीताने म्हटले आहे. माझे लग्न झाले नसून पाकिस्तानात गेले तेव्हा मी खूप लहान होते, असेही गीताने सांगितले आहे. आम्ही गीता व माहतो कुटुंबियांची डीएनए टेस्ट करणार असून तोपर्यंत गीताला इंदौर येथील एका संस्थेत पाठवण्यात येणार असे स्वराज यांनी सांगितले. डीएनए चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यास परिस्थिती थोडीशी क्लिष्ट होईल, पण आम्ही गीता व माहतो कुटुंबियांना समोरासमोर बसवून चर्चा करू, असे त्यांनी स्पष्ट केले. गीताच्या कुटुंबियांचा शोध लागो किंवा न लागो ती भारताची मुलगी असून आम्ही तिची काळजी घेऊ असे स्वराज म्हणाल्या.