पाकिस्तानात अडकलेली गीता भारतात परतणार
By admin | Published: October 15, 2015 11:41 PM2015-10-15T23:41:31+5:302015-10-15T23:41:31+5:30
सुमारे १५ वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानमध्ये गेलेल्या व तेव्हापासून तेथेच अडकून पडलेल्या गीता या मूक-बधिर मुलीच्या बिहारमध्ये राहणाऱ्या कुटुंबाचा शोध लागला
नवी दिल्ली/ कराची : सुमारे १५ वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानमध्ये गेलेल्या व तेव्हापासून तेथेच अडकून पडलेल्या गीता या मूक-बधिर मुलीच्या बिहारमध्ये राहणाऱ्या कुटुंबाचा शोध लागला असून येत्या काही दिवसांत तिला भारतात परत आणण्यात येणार आहे.
अशाच प्रकारे भारतात अडकलेल्या एका पाकिस्तानी मूक-बधिर मुलीला तिच्या नातेवाईकांकडे पोहोचविण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या ‘बजरंगी भाईजान’चे काल्पनिक कथानक सलमान खानने बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर साकारल्यानंतर गीताची सत्यकथा प्रसिद्धी माध्यमांतून समोर आली व तिच्या भारतातील कुटुंबाचा शोध घेण्याच्या प्रयत्नांना गेल्या काही महिन्यांत गती आली होती.
गीताच्या कुटुंबाचा शोध लागल्याचे शुभवर्तमान परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी गुरुवारी टिष्ट्वटरवर जाहीर केले. त्यांनी टिष्ट्वटमध्ये लिहिले, ‘गीता लवकरच भारतात परत येईल. आम्ही तिच्या कुटुंबाचा शोध घेतला आहे. डीएनए चाचणी केल्यानंतरच तिला तिच्या कुटुंबाच्या हवाली केले जाईल.’
एधी फाऊंडेशन ही पाकिस्तानमधील सर्वात मोठी व प्रतिष्ठित स्वयंसेवी संस्था गेली अनेक वर्षे त्यांच्या कराचीतील अनाथालयात गीताचा सांभाळ करीत आहे. भारताच्या पाकिस्तानमधील दूतावासाने गुरुवारी एक फोटो एधी फाऊंडेशनकडे ईमेल केला. तो फोटो गीताला दाखविला असता तिने त्या फोटोतील व्यक्तींना ओळखले व ते आपले कुटुंबीय असल्याचे सांगितले. तो फोटो गीताचे वडील, सावत्र आई आणि भावंडांचा होता.
गीताची कथा सर्वश्रुत झाल्यानंतर भारताच्या विविध भागांतील किमान चार कुटुंबे ती आपली मुलगी असल्याचे सांगत पुढे आली आहेत. त्यामुळे आताच्या ताज्या फोटोतील व्यक्ती आपले कुटुंबीय असल्याचे सांगत असली तरी त्यांचे रक्ताचे नाते डीएनए चाचणीने सिद्ध झाल्यानंतरच गीताला पाकिस्तानातून आणून या कुटुंबियांच्या हवाली केले जाईल, असा स्वराज यांच्या टिष्ट्वटचा अन्वयार्थ आहे.
डीएनए चाचणी वगळता गीताच्या भारतीय नागरिकत्वाची खातरजमा करण्यासह तिला परत आणण्याच्या अन्य औपचारिकता पूर्ण होत आल्या असल्याचे परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.
स्वराज यांनी केलेल्या टिष्ट्वटला कराचीतून एधी फाऊंडेशनकडूनही दुजोरा मिळाला. फाऊंडेशनचे प्रवक्ते अन्वर काझमी यांनी सांगितले की, भारतीय दूतावासाने पाठविलेल्या फोटोतील व्यक्ती गीताने ओळखल्या असून ते आपले आई-वडील व चार भावंडे असल्याचे तिने सांगितले आहे.
तरीही कोणत्याही संभ्रमास जागा राहू नये यासाठी फोटोतील या व्यक्ती व गीताचे एकदा स्काइपवर प्रत्यक्ष बोलणे करून दिले जावे, असे आम्हाला वाटते. गीतानेही त्यांच्याशी बोलण्याची (अर्थात खाणा-खुणा करून) इच्छा व्यक्त केली आहे, असेही काझमी यांनी सांगितले.
सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यावर गीताला येत्या २० ते २६ आॅक्टोबर दरम्यान केव्हा तरी भारतात परत आणले जाईल. पण नक्की दिवस अद्याप ठरलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले. एधी फाऊंडेशनच्या सूत्रांनी फाऊंडेशनचे संस्थापक अब्दुल सत्तार एधी यांच्या पत्नी बिल्किस या स्वत: गीताला घेऊन भारतात जातील, असेही संकेत दिले. एधी दाम्पत्यानेच इतकी वर्षे गीताचा स्वत:च्या मुलीसारखा सांभाळ केला आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
>पाकिस्तानमधील अग्रगण्य मानवी हक्क कार्यकर्ते व तेथील त्याच खात्याचे माजी मंत्री अन्सार बर्नी यांनीही गीताला तिच्या कुटुंबाकडे परत पाठविण्यासाठी एखादे व्रत घेतल्यासारखी मोहीम हाती घेतली होती.
>>गीता आणि तिच्या कुटुंबाचे सुमारे १५ वर्षांच्या ताटातुटीनंतर पुनर्मिलन होणार आहे. गीता पाकिस्तानात गेली कशी, याची नक्की माहिती नाही. परंतु अमृतसरहून अट्टारीमार्गे लाहोरला जाणाऱ्या रेल्वेगाडीतून ती चुकून पाकिस्तानात पोहोचली, असे मानले जाते. तेव्हा गीता ११ वर्षांची होती.