सचिन पायलटांवर गेहलोत यांची कुरघोडी; बंडखोरांना पक्षश्रेष्ठींची ‘क्लीन चिट’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 06:31 AM2022-12-15T06:31:06+5:302022-12-15T06:31:22+5:30
गेहलोतांनी माफी मागितली
लोकमत न्यूज नेटवर्क
जयपूर : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील संघर्षात गेहलोत गटाने त्यांच्यावर कुरघोडी केली आहे. पायलट यांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या गेहलोत गटाच्या तीन नेत्यांनी माफी मागितल्यानंतर त्यांना पक्षश्रेष्ठींनी ‘क्लीन चिट’ दिली आहे. त्यापैकी एक धर्मेंद्र राठोड यांचा भारत जोडो यात्रेच्या पाहुणचार समितीत समावेश करण्यात आला. तर कोटा दौऱ्यात शांती धारीवाल यांनी शक्तिप्रदर्शन केले आणि त्या राहुल गांधींसोबत सहभागीही झाल्या आहेत.
पायलट यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या मुद्द्यावरून २५ सप्टेंबर रोजी बंडखोरी करणारे गेहलोत गटातील मंत्री शांती धारिवाल, महेश जोशी आणि त्यांच्या निकटवर्तीय धर्मेंद्र राठोड यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. खुद्द सचिन पायलट यांनी या तिन्ही नेत्यांवर कारवाईची मागणी उघडपणे केली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडानंतर पक्षश्रेष्ठींनी पाठवलेल्या नोटीसवर तीनही बंडखोरांनी बिनशर्त माफी मागितली. बैठकीत तिन्ही उत्तरे सादर करण्यात आली. बैठकीत कारवाईबाबत चर्चा झाली आणि पक्षश्रेष्ठींनी माफीनामा मान्य केला. गेहलोत यांनीही माफी मागितली आहे.