जनरल बिपिन रावत यांच्या चॉपरला झालेल्या अपघाताबद्दल देशाला शंका- संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 10:29 AM2021-12-09T10:29:04+5:302021-12-09T10:31:38+5:30
रावत यांच्या चॉपरला अपघात झाल्याचं वृत्त ऐकून देशाचं नेतृत्त्वदेखील गोंधळलं असेल- संजय राऊत
नवी दिल्ली: चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांच्या अपघाती निधनाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. रावत प्रवास करत असलेलं हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित मानलं जातं. मात्र तरीही त्यांच्या चॉपरला अपघात झाला. या अपघाताबद्दल देशवासीयांच्या मनात शंका आहे, असं राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.
लष्कराच्या गणवेशाचा एक रुबाब असतो. रावत हे तर देशाचे सेनापती होते. मात्र तरीही ते आमच्याशी बोलताना तो रुबाब बाजूला ठेवून बोलायचे. काल रावत यांच्या चॉपरला अपघात झाल्याचं वृत्त समजलं, तेव्हा आम्ही संसदेजवळ असलेल्या गांधीजींच्या पुतळ्याजवळ होतो. बातमी समजताच तिथे मोठा हाहाकार उडाला. या अपघाताबद्दल सगळ्यांच्याच मनात शंका आहे, असं राऊत यांनी म्हटलं.
संजय राऊत यांनी रावत यांच्या काही आठवणींनादेखी उजाळा दिला. रावत देशाचे सर्वोच्च सेनापती होते. त्यांच्या अचानक झालेल्या अपघाती निधनानं देशाचं सर्वोच्च नेतृत्त्वदेखील गोंधळलं असेल. त्यांच्याही मनात शंका निर्माण झाली असेल. देशाची अनेक संरक्षणविषयक गुपितं त्यांना माहीत होतं. सर्वोच्च स्थानी असतानाही ते समोरच्या व्यक्तीशी स्वत:चा रुबाब बाजूला ठेऊन बोलायचे, अशी आठवण राऊत यांनी सांगितली.
संरक्षण समितीत अनेकदा रावत यांच्याशी अनेकदा संवाद साधला. संरक्षण समितीत सर्वपक्षीय नेते असतात. त्यांच्याकडून अनेकदा प्रश्न उपस्थित होतात. त्या सगळ्या प्रश्नांना रावत उत्तरं द्यायचे. किचकट विषय ते सोपे करून सांगायचे. सगळ्या शंकाचं निरसन करायचे. सामान्य सैनिकापर्यंत त्यांचा संवाद होता, असं राऊत यांनी सांगितलं.