जनरल बिपीन रावत देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 03:24 PM2019-12-30T15:24:36+5:302019-12-30T15:26:20+5:30
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदावरील व्यक्ती ही 'फोर स्टार जनरल' च्या समकक्ष असेल. तसेच त्यांचे स्थान हे तिन्ही दलांच्या प्रमुखांमध्ये सर्वात वरचे असेल.
नवी दिल्ली - मावळते लष्करप्रमुख बिपीन रावत यांची चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी निवड करण्यात आली आहे. बिपीन रावत हे देशाचे पहिले 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' बनणार आहेत. लष्करप्रमुख बिपीन रावत हे 31 डिसेंबर रोजी पदावरून निवृत्त होत आहेत. त्यानंतर मनोज मुकुंद नरवणे हे लष्करप्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारतील. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदावरील व्यक्ती ही 'फोर स्टार जनरल' च्या समकक्ष असेल. तसेच त्यांचे स्थान हे तिन्ही दलांच्या प्रमुखांमध्ये सर्वात वरचे असेल.
केंद्र सरकारने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या कार्यकालामध्ये तीन वर्षांनी वाढ करण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. त्यामुळे आता या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीचा कार्यकाळ हा 62 ऐवजी 65 वर्षे एवढा असणार आहे. दरम्यान, लष्करप्रमुखपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर बिपीन रावत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाचा कार्यकाळ स्वीकारण्याची शक्यता आहे.
संरक्षण दलांना बळकटी देण्यासाठी आणि तिन्ही दलांमध्ये योग्य समन्वय आखण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यात मंजुरी दिली होती. 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धानंतर सैन्य दलांमध्ये योग्य समन्वय राखला जावा यासाठी असा प्रकारचे पद निर्माण करण्याची शिफारस करण्यात आली होती. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सैनिकी मोहिमेदरम्यान तिन्ही दलांमध्ये समन्वय राखण्याचे काम करेल.
स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केली होती. संरक्षण दलांना बळकटी देण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पद तयार करण्यात येणार असल्याचे मोदींनी सांगितले होते. संरक्षण दलांमध्ये सुधारणा कराव्यात, अशी मागणी बऱ्याच कालावधीपासून सुरू होती. त्याच अनुषंगानं हा निर्णय घेण्यात आल्याचे मोदी म्हणाले होते. ''चीफ ऑफ डिफेन्स स्टाफकडे तिन्ही दलांमध्ये समन्वय राखण्याचं काम असेल. सध्या जग वेगानं बदलत आहे. त्यामुळे भारताला तुकड्या तुकड्यांमध्ये विचार करता येणार नाही. आपल्या सैन्य दलांनी एकत्रितपणे पुढे जायला हवं. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफमुळे तिन्ही दलांना वरिष्ठ पातळीवर एक प्रभावी नेतृत्व मिळेल,''असा विश्वास मोदींनी त्यावेळी व्यक्त केला होता.