कोणत्या वयोगटातील किती मतदार? निवडणूक आयुक्तांनी दिली माहिती, हिंसा करणाऱ्यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 04:21 PM2024-03-16T16:21:42+5:302024-03-16T16:25:56+5:30
Election Commission: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. शनिवारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन येत्या काळात होणारी लोकसभा निवडणूक आणि काही भागातील पोटनिवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी तारखा जाहीर करण्याआधी विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला. कोणत्या वयोगटातील किती मतदार, तृतीयपंथी मतदारांची संख्या, ज्येष्ठ नागरिक आणि १०० हून अधिक वय असलेल्या मतदारांची आकडेवारी सांगितली. तसेच त्यांनी निवडणुकीच्या काळात हिंसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा दिला.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, २०२४ हे वर्ष जगभरातील निवडणुकांचे वर्ष आहे. आमची टीम निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहे. आम्ही पूर्ण निष्पक्षपणे निवडणुका घेण्यास तयार आहोत, असा आम्हाला विश्वास आहे. यावेळी देशात ९७ कोटी मतदार आहेत. देशात होणाऱ्या निवडणुकांकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत. सर्वात मोठ्या लोकशाही देशात निवडणुका घेणे हे आपल्यासमोर आव्हान आहे.
कोणत्या वयोगटातील किती मतदार?
तसेच गेल्या ११ राज्यांच्या निवडणुका शांततेत आणि हिंसामुक्त झाल्या आहेत. या राज्यांमध्ये जवळपास कोणतेही फेरमतदान झाले नाही. आम्ही या प्रकरणात आणखी सुधारणा करू. देशातील ९७ कोटी मतदारांसाठी १०.५ लाख मतदान केंद्रे बांधण्यात आली असून त्यासाठी १.५ कोटी कर्मचारी तैनात केले जातील आणि ५५ लाख ईव्हीएम मशीन्स असतील. सध्या देशात एकूण ९६.८ कोटी मतदार असून त्यापैकी ४९.७ कोटी पुरुष आणि ४७ कोटी महिला आहेत. त्यापैकी १.८२ कोटी पहिल्यांदाच मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २० ते २९ वयोगटातील १९.४७ कोटी मतदार आहेत. तर ४८ हजार तृतीयपंथी मतदार आहेत.
निवडणूक आयुक्त आणखी म्हणाले की, यंदाच्या निवडणुकीत ८५ लाखांहून अधिक महिला प्रथमच मतदानात सहभागी होणार आहेत. निवडणुका मुक्त आणि निष्पक्षपणे पार पाडणे आमच्यासमोरील आव्हान आहे, त्यासाठी 4M निश्चित करण्यात आले आहेत. ताकद (Muscle), पैसा (Money), चुकीची माहिती (Misinformation) आणि आचारसंहितेचे उल्लंघन (MCC Violations) रोखण्यासाठी निवडणूक आयोग वचनबद्ध आहे. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विविध उपाययोजना केल्या करण्यात आल्या आहेत.
हिंसा करणाऱ्यांना इशारा
ज्येष्ठ नागरिकांना सुविधा देण्याबाबत बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, देशभरातील ८५ वर्षांवरील सर्व मतदारांना त्यांच्या घरातून मतदान करता येईल. यावेळी देशात प्रथमच ही प्रणाली लागू केली जाणार आहे. सोबतच जे मतदार ८५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत आणि ४०% पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या मतदारांनी मतदानाचा हा पर्याय निवडल्यास आम्ही त्यांना फॉर्म पाठवू.
"निवडणूक आयोग अफवा पसरवणाऱ्यांवरही कारवाई करेल. खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. आयोग सत्य आणि खोटे काय याची माहितीही उघड करेल. निवडणूक प्रचारादरम्यान, राजकीय पक्षांना द्वेष पसरेल असे भाषण करण्यास मनाई केली जाईल, राजकीय पक्षांनी धार्मिक टिप्पणी करणे टाळावी. निवडणुकीत हिंसाचाराला कोणताही थारा नाही. कुठूनही हिंसाचाराची माहिती मिळाल्यास आम्ही त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करू. त्यामुळे खोट्या बातम्या आणि अनावश्यक माहिती शेअर केल्यास कारवाई केली जाईल", असेही राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.
Celebrating Inclusivity!
— Election Commission of India (@ECISVEEP) March 16, 2024
Growth in voter categories, especially women, youth & PwDs reflects ECI commitment to inclusive rolls. With ~82 lakhs PwDs, 2.2 lakh 100+ & 48k Third gender voters, our rolls reflect a diverse mosaic of electorate.#ECI#ChunavKaParv#DeshKaGarvpic.twitter.com/zlLIUOaAiH