काश्मीरच्या विभाजनानंतर जनरल नॉलेजच्या या प्रश्नांची उत्तरेही बदलली; पाहा कोणती...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 06:23 PM2019-08-07T18:23:13+5:302019-08-07T18:24:12+5:30
केंद्र सरकारने नुकतेच जम्मू काश्मीरचे 370 कलम जवळपास रद्दच केले आहे.
बँक परिक्षा असो की एमपाएससी, एक प्रश्न नेहमी विचारला जातो. जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याने या प्रश्नाचे उत्तरच बदलले आहे. केंद्र सरकारने नुकतेच जम्मू काश्मीरचे 370 कमल जवळपास रद्दच केले आहे. हे राज्य आता विभागले गेले असून केंद्रशासित प्रदेश झाले आहे. यामुळे हे प्रश्न येणाऱ्या स्पर्धा परिक्षांसाठी खूप महत्वाचे आहेत.
1. देशात किती विधान परिषदा आहेत?
आधी या प्रश्नाचे उत्तर सात होते. मात्र, जम्मू काश्मीर विभाजनानंतर ही संख्या कमी होऊन सहा झाली आहे. सध्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगानामध्ये विधानपरिषदा आहेत. जम्मू काश्मीर केंद्रशासित झाल्याने तेथे केवळ विधानसभा अस्तत्वात राहणार आहे. अशीच स्थिती दिल्लीमध्ये आहे. दिल्लीतही केवळ विधानसभा आहे. जम्मू काश्मीर विधानपरिषदेमध्ये 36 जागा होत्या. यामध्ये 11 पीडीपी, 11 भाजपा, 4 काँग्रेस आणि 4 नॅशमल कॉन्फ्रेन्स असे सदस्य होते. शिवाय 6 जागा रिकाम्या होत्या.
देशात केंद्रशासित प्रदेश किती?
जम्मू-काश्मीर पूनर्रचना विधेयक संमत झाल्यानंतर एक राज्य कमी झाले असले तरीही केंद्र शासित प्रदेशांच्या संख्येत दोनने वाढ झाली आहे. या आधी देशात सात केंद्र शासित प्रदेश होते. मात्र, जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन प्रदेशांची भर पडल्याने ९ झाली आहे.
केंद्रशासित प्रदेश कोणते?
देशाची राजधानी दिल्ली, अंदमान आणि निकोबार बेटे, चंदीगढ, दादरा आणि नगर हवेली, दीव-दमन, लक्षद्वीप, पुदूच्चेरी असे आधीचे सात आणि आता वाढलेले जम्मू काश्मीर, लडाख असे दोन मिळून नऊ केंद्रशासित प्रदेश झाले आहेत.
भारतात राज्यांची संख्या किती?
भारतात राज्यांची संख्या पुन्हा एकदा 28 झाली आहे. जम्मू काश्मीर आता राज्य राहिलेले नाही. आधी देशात 29 राज्ये होती. त्यापूर्वी याची संख्या 28 होती. मात्र, आंध्र प्रदेशाचे विभाजन होऊन तेलंगानाचा जन्म झाल्याने ही संख्या वाढली होती.